नव्या प्रकल्पांमध्ये ४६ टक्क्य़ांची वाढ;  मात्र पाच लाख घरे ग्राहकांविना शिल्लक

पुणे : गेली दोन वर्षे गृहबांधणी क्षेत्रात सुरू असलेले मंदीचे वातावरण अद्यापही कायमच आहे. किमतीमध्ये घट होऊनही घरांची विक्री मंदावलेलीच आहे. २०१८ च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये घरांच्या विक्रीचे प्रमाण जेमतेम तीन टक्क्यांनी वाढले आहे. याच काळात देशभरात ९१ हजारांहून अधिक नवीन गृहप्रकल्प सादर झाले, तर मुंबई आणि पुण्यात घरांच्या कि मती अनुक्रमे नऊ टक्के आणि आठ टक्क्यांनी घटल्या आहेत. आजमितीला देशात जवळपास ५ लाख घरे ग्राहकांविना पडून आहेत.

नाइटफ्रँक इंडियाने जानेवारी ते जून या सहा महिन्यांतील गृहबांधणी क्षेत्रात झालेल्या उलाढालींचा अहवाल बुधवारी जाहीर केला. देशभरात नव्या प्रकल्पांमध्ये ४६ टक्क्यांनी वाढ झाली. दिल्ली, पुणे, कोलकाता, बंगळुरू, हैद्राबाद, चेन्नई या प्रमुख शहरांच्या तुलनेत मुंबईत ४० टक्के अधिक नवे गृहप्रकल्प उभारण्यात आले. नव्या गृहप्रकल्पांमध्ये मुंबईत १२८ टक्क्यांनी, तर पुण्यात ७५ टक्क्यांनी वाढ झाली. घरांच्या एकूण निर्मितीपैकी ५१ टक्के वाटा किफायतशीर घरांचा आहे. मुंबई, पुणे, कोलकाता आदी प्रमुख शहरांमध्ये घरांच्या किमती कमी होत असताना एकटय़ा हैद्राबादमधील घरांच्या किमतीमध्ये ८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. घरांच्या विक्रीचे सर्वाधिक प्रमाण मुंबई आणि बंगळुरूमध्ये असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

‘आगामी निवडणुका, चलनवाढ आणि गृहकर्जाचे व्याजदर याबाबत अनिश्चितता आहे. त्याचा परिणाम या क्षेत्रावर होत आहे. रेरा आणि जीएसटी यातून हे क्षेत्र आता बऱ्यापैकी सावरले आहे. बांधकाम क्षेत्रातील मंदीचे वातावरण येत्या काळात बदलेल अशी अपेक्षा आहे,’ असे नाइटफ्रँक इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी नमूद केले.

योजनांनाही प्रतिसाद नाही

एकीकडे नवे प्रकल्प उभे राहत असताना, घरांच्या किमतींमध्ये घट होत असूनही गृहखरेदीसाठी ग्राहक पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. बांधकाम व्यावसायिकांकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जीएसटी, ताब्यानंतर गृहकर्जाचे हप्ते सुरू अशा अनेक योजना सादर केल्या जात आहेत. मात्र, घरांच्या विक्रीचे प्रमाण तुलनेने मंदावलेलेच आहे.

व्यावसायिक जागांना अधिक मागणी

एकीकडे घरांची विक्री मंदावलेली असली, तरी व्यावसायिक वापरासाठीच्या जागांना मागणी असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. प्रत्यक्ष विक्रीचे प्रमाण जास्त नसले, तरी जागा भाडय़ाने घेण्याकडे कल आहे.