News Flash

राज्यातील ५० हजार बांधकाम मजुरांना मिळणार आता रात्रीचेही जेवण!

मुंबई, ठाणे व पुणे येथील बांधकाम मजुरांना रात्रीचे जेवण

अनेक मजूर गेल्या काही दिवसांत आपल्या गावी परत जाण्यासाठी परत निघाले होते. यापैकी आता काही जण शहरांमध्ये अडकले आहेत. त्यांचे हे प्रातिनिधिक छायाचित्र (अरुल हॉरिझन)

संदीप आचार्य

करोनामुळे राज्यात टाळेबंदी लागू केल्यापासून सर्वात जास्त हाल सुरु आहेत ते परराज्यातून आलेल्या बांधकाम मजुरांचे व असंघटित क्षेत्रातील लोकांचे. यातील बांधकाम मजुरांना शासनाकडून दिवसा जेवण देण्यात येत होते. तथापि रात्रीच्या जेवणाचा निर्णय होत नव्हता. अखेर शासनाने या मजुरांना रात्रीचे जेवण देण्याचा निर्णय घेतला.

नागपूरमध्ये मजुरांना रात्रीचे जेवण देण्यास सुरुवात झाली असून उद्यापासून मुंबई, ठाणे व पुणे येथील बांधकाम मजुरांना रात्रीचे जेवण सुरु केले जाईल, असे राज्य इमारत व इतर बांधकाम कल्याण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीरंगन यांनी सांगितले.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, पुणे व नागपूर आदी शहरात प्रामुख्याने इमारत बांधकाम होत असते. या इमारत बांधकामासाठी प्रामुख्याने बाहेरच्या राज्यातून कूशल मजूर येतात. राज्याच्या अर्थव्यवस्थेत बांधकाम क्षेत्राचे मोठे योगदान असून टाळेबंदी उठल्यावर पुन्हा बांधकाम क्षेत्राला वेग येण्याची गरज आहे. टाळेबंदीमुळे मोठ्या प्रमाणात मजूर आपल्या गावी निघून गेले तर जे मजूर राज्यात अडकले आहेत. त्यांचे येथे कोणीही नातेवाईक नाहीत तसेच त्यांच्याकडे रेशनकार्डही नसल्याने या मजुरांना एकवेळचे जेवण देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्याची अंमलबजावणी राज्यात होत असली तरी रात्रीच्यावेळी या मजुरांवर उपाशी राहाण्याची वेळ येते किंवा काही ठिकाणी बांधकाम व्यावसायिक वा ठेकेदार त्यांच्या भोजनाची व्यवस्था करतात.

राज्यात सध्या १२ लाख १८ हजार नोंदणीकृत बांधकाम मजूर असून त्यापैकी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे व नागपूर येथील ४६,६०० बांधकाम मजुरांना सध्या सकाळचे जेवण देण्यात येत आहे. यात आगामी काही दिवसात आणखी १० हजारांची भर पडणार आहे. मुख्य सचिव अजय मेहता यांनी एक आदेश जारी केला असून त्यानुसार या मजुरांना आता रात्रीचेही जेवण देण्यात येणार असल्याचे राज्य इमारत व इतर बांधकाम कल्याण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीरंगन यांनी सांगितले.

या मजुरांना पोळी, भात, आमटी तसेच लोणचे असे जेवण देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. तीन संस्थांच्या माध्यमातून सध्या हे जेवण देण्यात येत असून या मजुरांना जेवण बनवून देण्याऐवजी थेट रेशन दुकानाच्या माध्यमातून डाळ, तांदुळ, गहू आदी धान्य दिल्यास त्यांना व त्यांच्या कुटुंबाला पुरेसे अन्न मिळेल, असाही एक प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2020 7:42 pm

Web Title: real estate workers of maharashtra will get second time food in lockdown
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Lokckdown: महावितरणचा ‘या’ ग्राहकांना दिलासा; बिलातील स्थिर आकार ३ महिन्यांसाठी स्थगित
2 राज्य सरकारचा निर्णय : नववी आणि ११वी च्या परीक्षा रद्द, दहावीच्या भूगोल, कार्यशिक्षणचेही पेपर रद्द
3 पाटील Vs पाटील : चंद्रकांत दादा, साठीच्या वरील लोकांना करोनाचा धोका -जयंत पाटील
Just Now!
X