राज्यात एकीकडे करोनाचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे मालेगावकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आळी आहे.   रविवारी तीन करोनामुक्त रुग्णांना घरी सोडण्याच्या घटनेने थोडाफार दिलासा मिळाला असताना आता सोमवारी शहरातील तब्बल ४३९ रुग्णांच्या करोना चाचणीचा अहवाल नकारात्मक आल्याने मालेगावावकरांना आणखी एक सुखद् धक्का बसला आहे. प्राप्त झालेल्या एकुण ४४० अहवालांपैकी केवळ एक अहवाल सकारात्मक आला आहे. आतापर्यंत शहरातील करोना बाधितांची संख्या १२७ झाली असून करोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या 12 झाली आहे.

आठ एप्रिल रोजी येथे प्रथम पाच करोना बाधित रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर रोजच बाधितांची संख्या वाढत गेली. त्यामुळे तपासणीच्या अहवालाकडे लक्ष असणाऱ्या लोकांच्या मनात एक प्रकारे भीती होती. मात्र रविवारी प्राप्त झालेले सर्व दहा अहवाल नकारात्मक आले. पाठोपाठ करोनामुक्त झालेल्या तिघा रुग्णांनाही घरी सोडण्यात आल्याच्या बातमीने शहरवासियांना दिलासा मिळाला असतानाच सोमवारी आणखी एक मोठी सकारात्मक बातमी समोर आली. ४३९ अशा मोठ्या संख्येने आलेल्या नकारात्मक अहवालांमुळे जीव भांड्यात पडण्यासारखी लोकांची गत झाली आहे.

येथील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या नऊ बाधित रुग्णांचा पहिला अहवाल रविवारी नकारात्मक आला होता. आता त्यातील चार जणांचा दुसरा अहवालही नकारात्मक आल्याने सोमवारी सायंकाळी त्यांना येथील मंसुरा हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले. शिवाय आणखी काहींचा दुसरा अहवाल नकारात्मक येण्याची शक्यता आहे. दरम्यान,रविवारी सायंकाळी येथील सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सहा संशयित महिला रुग्णांनी पलायन करण्याचा गंभीर प्रकार घडला. पोलिसांनी वेळीच शोध घेतल्याने या महिलांना पुन्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. सामान्य रुग्णालय ‘नाॅन कोविड’ रुग्णालय करण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून तेथे दाखल असणाऱ्या संशयित रुग्णांना करोना रुग्णांसाठी व्यवस्था करण्यात आलेल्या शहरातील अन्य रुग्णालयांमध्ये भरती करण्यात येत आहे. याच अनुषंगाने या महिलांनाही येथून हलविण्यात येणार होते. तथापि दुसऱ्या रुग्णालयांमध्ये योग्य उपचार होत नाही असा गैरसमज असल्याने भीतीपोटी या महिला रुग्णांनी पळ काढला असण्याचा संशय आहे.