राष्ट्रवादीत क्षीरसागर बंधूंची कोंडी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभेतील उपगटनेते आमदार जयदत्त क्षीरसागर यांचे बंडखोर पुतणे संदीप यांनाच हल्लाबोल यात्रेतही पक्षाच्या नेत्यांनी उघडपणे बळ दिल्याने संदीप यांनी काका आमदार जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांना पक्षाच्या जाहीर कार्यक्रमांना अप्रत्यक्षपणे बंदीच केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. प्रदेश स्तरावरील बठकीत आणि जिल्हाबाहेरील कार्यक्रमात पक्षाच्या प्रमुख नेत्यांबरोबर पहिल्या रांगेत दिसणाऱ्या आमदार क्षीरसागरांना पक्षानेच स्वत:च्या मतदारसंघात बाजूला ठेवल्याने पुरती कोंडी झाल्याने ‘मान सांगावा जनाला अन् अवमान मनाला’ अशीच क्षीरसागर बंधूंची अवस्था झाली आहे.

बीड जिल्ह्य़ात जयदत्त क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांनी दीड वर्षांपूर्वी गृहकलहानंतर दोन्ही काकांविरुद्ध नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत स्वतंत्र आघाडी करून आव्हान दिले होते. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील फाटाफुटीनंतर संदीप यांना पक्षाचे नेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उघडपणे पाठबळ दिल्याने बीड मतदारसंघातील पक्षाची सूत्रे संदीप यांच्याकडे आली. पक्षाचे नेते अजित पवार यांनी संदीप यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावून अप्रत्यक्षपणे क्षीरसागर बंधूंना बाहेरचाच रस्ता दाखवला. पक्षाच्या कार्यक्रमांचे नियोजनच संदीप यांच्याकडे आल्यामुळे त्यांनी दोन्ही काकांना मागील वर्षभरापासून पक्षाच्या जाहीर कार्यक्रमात अप्रत्यक्षपणे प्रवेशबंदीच केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. हल्लाबोल यात्रेच्या सुरुवातीला उस्मानाबाद येथे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर आमदार जयदत्त क्षीरसागर पहिल्या रांगेत दिसले.

राज्यपातळीवरील शरद पवार यांच्याबरोबरच्या बठकांमध्येही आमदार क्षीरसागर पहिल्या रांगेत असतात. मात्र, मतदारसंघात पुतणे संदीप यांनी पक्षाची सर्व सूत्रे आपल्याकडे घेतल्यामुळे पक्षाच्या जाहीर कार्यक्रमात क्षीरसागर बंधूंना कुठलेच स्थान राहिले नाही. हल्लाबोल यात्रेचीही जबाबदारी संदीप यांच्याकडेच असल्याने दोन्ही क्षीरसागर काकांसह त्यांच्या कार्यकर्त्यांना बाजूला ठेवूनच कार्यक्रमाचे नियोजन झाले.