12 December 2019

News Flash

अभ्यासक्रमात संगीतोपचाराच्या समावेशाबाबत पुनर्विचार

भारतीय संगीत या विषयात ‘संगीतोपचार’ या मुद्दय़ाच्या समावेशाबाबत पुनर्विचार करण्यात येणार आहे

आराखडय़ावरील आक्षेपांचा परिणाम

पुणे : अकरावीच्या बदलणाऱ्या अभ्यासक्रमातील भारतीय संगीत या विषयात ‘संगीतोपचार’ या मुद्दय़ाच्या समावेशाबाबत पुनर्विचार करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाच्या आराखडय़ावर हरकती-सूचना नोंदवण्यात आल्यामुळे अंतिम अभ्यासक्रमात हा मुद्दा वगळला जाण्याची शक्यता आहे.

यंदा अकरावी आणि पुढील वर्षी बारावीची पुस्तके बदलणार आहेत. बदलणाऱ्या अभ्यासक्रमाचा आराखडा क्षमता विधानाच्या रुपात शिक्षण विभागाने बालभारतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला होता. त्यातील भारतीय संगीत या विषयात संगीतोपचाराचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, अद्याप कोणताही शास्त्रीय आधार नसलेल्या संगीतोपचारांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आल्याचा प्रकार ‘लोकसत्ता’ने ६ मे रोजी उघडकीस आणला होता. संगीतातून आजार बरे होतात असा दावा करत ‘संगीतातून रोगमुक्ती होऊ  शकते याची अनुभूती घेणे’ या मुद्दय़ाचा आराखडय़ात समावेश करण्यात आला होता. त्या अनुषंगाने शरीरातील व्याधी, अवयव यांची चिकित्सा आणि संगीत यांचे शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याबाबत प्रस्तावित करण्यात आले होते. या आराखडय़ावर हरकती सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यात संगीतोपचारांवर हरकती नोंदवण्यात आल्याने आता या मुद्दय़ावर अभ्यास समितीकडून पुनर्विचार केला जाईल.

‘विद्यार्थ्यांना संगीताची ओळख करून देण्याचा अभ्यासक्रमाचा विचार होता. मात्र, संगीतोपचाराच्या मुद्दय़ावर हरकती सूचना नोंदवण्यात आल्या आहेत. त्यामुळे समितीसमोर या हरकती-सूचना मांडल्या जातील. त्यानंतर या बाबत समिती पुनर्विचार करून पुढील निर्णय घेईल,’ असे बालभारतीचे संचालक सुनील मगर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

विचारात घेण्याजोग्या सूचना.

अभ्यासक्रमाच्या आराखडय़ावर एकूण ५५५ जणांची  नोंदणी झाली. त्यातील २०८ जणांनी शब्दांमध्ये आपले भाष्य मांडले. तर १११ जणांनी भाष्याची प्रत (कॉमेंट अ‍ॅटॅचमेंट) जोडली. आराखडय़ाला ७५ हजार २९६ जणांनी भेट दिली. नोंदवण्यात आलेल्या एकूण हरकती- सूचनांपैकी काही विचारात घेण्याजोग्या आहेत, असे बालभारतीचे संचालक सुनील मगर यांनी सांगितले.

First Published on June 20, 2019 3:31 am

Web Title: reconsideration of the incorporation of music in the syllabus
Just Now!
X