दिवसभरात ४०० मालमोटारी कांदा विक्रीसाठी

सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीत आयात होणाऱ्या कांद्यातून गेल्या महिनाभरात तब्बल १०९ कोटीपेक्षा जास्त रकमेची उलाढाल झाली असताना शुक्रवारीही कांद्याची विक्रमी स्वरूपात आवक सुरूच होती. दिवसभरात सुमारे ४०० मालमोटारी भरून कांदा विक्रीसाठी आला होता. सध्या तुलनेत मिळत असलेला चांगला दर नजीकच्या काळात मिळण्याची शक्यता नसल्याचा अंदाज बांधून शेतकरी शेतातील आहे त्या स्थितीतील कांदा काढून विक्रीसाठी बाजार समितीत धावत आहेत.

गेल्या आठवडय़ापासून कांदा आवक होण्याचे प्रमाण विशेषत्वाने वाढले आहे. त्यातून एकेका दिवसात नऊ ते दहा कोटींची उलाढाल होत आहे. आणखी काही दिवस हीच परिस्थिती राहणार आहे. सध्या कृषिउत्पन्न बाजार समितीच्या परिसरात सर्वत्र कांद्याच्या पोत्यांचे ढीगच्या ढीग दिसून येतात. आयात होणारा कांदा लगेचच कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, तामिळनाडू आदी राज्यांत निर्यात होत असला तरी आयात कांद्याची उत्तरोत्तर भरच पडत आहे. एकेका आडत्यांच्या दुकानात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अक्षरश: झुंबड उडाल्याचेही चित्र पाहावयास मिळत आहे.

गेल्या आठवडय़ात कांद्याला कमाल दर पाच हजारांपेक्षा जास्त होता. सध्या कमाल दर घट होऊन ४५०० रुपये तर सर्वसाधारण दर २३०० रुपये इतका मिळत आहे. काद्याचे पीक वारेमाप झाल्यानंतर त्यास आता मिळणारा किफायतशीर दर पुढील आठवडय़ात कितपत मिळेल, याची शाश्वती नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आपापल्या शेतातील उत्पादित कांदा आहे तशा स्थितीत काढून विक्रीसाठी बाजार समितीत आणत आहे. उंचवटय़ावरील शेतात उत्पादित झालेला कांदा दर्जेदार असतो. त्याची पूर्ण वाढ होऊन काढणीनंतर तो वाळवावा लागतो. असा सुकलेला कांदा भाव मारून जातो. सध्या थंडी वाढली असताना कांद्याला रोग पडण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे जास्त वेळ न दवडता किंवा जोखीम न पत्करता शेतातील कांदा काढून शक्य तितक्या लवकर बाजारात विकण्याची शेतकऱ्यांची घाई दिसून येते.