नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात आज, सोमवारी झालेल्या कांदा लिलावात आतापर्यंतच्या हंगामातील उच्चांकी कांदा आवक झाली. आज ६८ हजार ४४७ गोण्या कांद्याची आवक झाली. सध्या नाशिक लाल कांद्याची जोरात आवक सुरू आहे.
बाजार समितीचे सभापती हरिभाऊ कर्डिले यांनी ही माहिती दिली. नेप्ती उपबाजारात एक नंबर प्रतीच्या लाल कांद्यास १ हजार ८०० ते २ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल, दोन नंबरच्या कांद्यास १ हजार १०० ते १ हजार ६०० रु. प्रतिक्विंटल, तीन नंबरच्या गोल्टी कांद्यास ४०० ते १ हजार रुपये प्रतिक्विंटल व जोडकांद्यास १५० रु. ते ३५० रु. बाजारभाव मिळाला.
नगर तालुका व परिसरातून येणारा कांदा मध्यंतरी झालेल्या पावसामुळे भिजल्याने कांद्याची प्रत काही प्रमाणात खालावली आहे. झालेला पाऊस ज्वारी, गहू, हरभरा, सूर्यफूल यांसारख्या पिकांना जरी फायद्याचा असला तरी कांदा उत्पादकांच्या डोळय़ांत मात्र त्याने पाणी आणले. पावसाचे पाणी कांद्याच्या गाभ्यात गेल्याने कांदा साठवणूक करणेही शेतकऱ्यांना शक्य नाही, त्यामुळे शेतकरी मिळेल त्या भावाने कांदा विकत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
नेप्ती उपबाजारात कांदा आवक वाढली असली तरी दरही चांगला मिळत आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाच्या हंगामातही पुरेशा सोयी उपलब्ध करून देऊन कांदा बिलात पारदर्शकता आणण्यासाठी समिती शेतकऱ्यांना सर्व मदत करेल, असेही उपसभापती नारायण आव्हाड व सचिव अभय भिसे यांनी पत्रकात नमूद केले आहे.