भ्रष्टाचारमुक्त भरतीचा शिक्षणमंत्र्यांचा दावा

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शिक्षण संस्थांमध्ये १० हजार शिक्षकांची भरती करण्याची अधिकृत घोषणा गुरुवारी राज्य सरकारने केली.

विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत पवित्र वेब पोर्टलवर शिक्षक भरतीची जाहिरात प्रदर्शित करण्यात आली. त्यानुसार शनिवारपासून प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू होईल. ही भरती पूर्णपणे भ्रष्टाचारमुक्त असेल, असा दावा शिक्षणमंत्री तावडे यांनी केला.

पुढील आठवडय़ात लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर लगेचच आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे त्या आधी शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार शालेय शिक्षण विभागातील बहुप्रतीक्षित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक भरतीची घोषणा करण्यात आली. त्या बाबतची जाहिरात शिक्षक भरतीसाठी तयार केलेल्या ‘पवित्र वेब पोर्टल’वर प्रदर्शित करण्यात आली.

राज्यात १०,००१ इतक्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांच्या जागा भरण्यात येणार आहेत. राज्यातील २५ जिल्हा परिषदा, ११ महानगरपालिका, ५२ नगरपालिका १२५ खासगी प्राथमिक आणि ६१२ खासगी माध्यमिक शिक्षण संस्थांमध्ये ही महाशिक्षक भरती होणार आहे, असे सांगण्यात आले.

या संदर्भात शिक्षणमंत्री तावडे यांनी सांगितले की, सुमारे ५०००च्या वर शिक्षक अतिरिक्त झाल्यामुळे समायोजनात रिक्त जागा कमी झाल्या. सहा जिल्ह्य़ातील बिंदू नामावलीनंतर शून्य जागा खुल्या, एसईबीसी आणि ईबीसी वर्गासाठी असल्यामुळे त्या सहा जिल्ह्य़ांच्या बिंदूनामावलीची फेरतपासणी केल्यानंतर या जागा त्वरित भरल्या जातील. तोपर्यंत तेथील ५० टक्के जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भ्रष्टाचारविरहित ही पहिलीच शिक्षक भरती होणार आहे आणि यातून शिक्षकांच्या भरतीच्या वेळी होणारे शिक्षकांचे आर्थिक शोषण थांबविण्यात सरकारला यश येईल, असा दावाही तावडे यांनी केला. विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टलमध्ये अर्ज करताना पोर्टलवरील माहिती शांतपणे वाचावी, कोणीही गोंधळून जाऊ  नये, जेणेकरून कमीत कमी त्रुटी राहतील. अनेक वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरती आता सुरू होत आहे. यासाठी शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, उपसचिव चारुशीला चौधरी यांच्या कार्यगटाने परिश्रम करून काम पूर्ण केले आहे, अशी माहिती तावडे यांनी दिली.

शिक्षक भरतीची जाहिरात पवित्र पोर्टलवर सध्या संस्थाचालक आणि शिक्षणाधिकारी यांना उपलब्ध होईल. ही जाहिरात २ मार्च २०१९ रोजी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होणार आहे. त्याचवेळी पवित्र पोर्टलवरही ही जाहिरात उमेदवारांना वाचता येईल, असेही तावडे म्हणाले.

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भ्रष्टाचारविरहित अशी ही पहिलीच शिक्षक भरती असेल. यातून शिक्षकांच्या भरतीच्या वेळी होणारे शिक्षकांचे आर्थिक शोषण थांबविण्यात सरकारला यश येईल.  – विनोद तावडे, शिक्षणमंत्री