नागपूर : येत्या दोन महिन्यांत १८ हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी केली. शिक्षण आणि क्रिडा विभागाच्या मागण्यांवर उत्तर देताना ते बोलत होते.

दोन महिन्यांत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून १८ हजार शिक्षकांच्या जागा भरण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया ऑनलाइन करण्यात येत असल्याने भरतीत पारदर्शकता येणार आहे. यामुळे शिक्षण संस्थांना गुणवत्ता यादीनुसार भरती करावी लागणार असल्याचे तावडे यांनी सांगितले.

राज्यातील अर्धवट क्रिडा संकुलांची कामे पूर्ण करण्यासाठी निधी देण्यात येत आहे. ३० खेळाडूंना थेट शासनात नियुक्ती देण्यात आली असून, ११ हजार ४६० खेळाडूंची प्रमाणपत्र पडताळणी पूर्ण झाल्याचे तावडे यांनी यावेळी सांगितले. पुढील ऑलिम्पिकसाठी ५५ खेळाडूंची निवड करण्यात आली असून त्यांच्यावर एक कोटी ७२ लाख खर्च करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

काठीण्य पातळी तपासणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे  विद्यार्थी हे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे पडू नयेत, यासाठी या दोन्ही अभ्यासक्रमांची काठीण्य पातळी तपासण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षणतज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. समितीचा अहवाल दिवाळीपूर्वी घेऊन त्यानुसार निर्णय घेण्यात येईल, असे अशी घोषणा तावडे यांनी विधानसभेत केली.

अकरावी प्रवेश घराजवळच्या महाविद्यालयात

अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांना त्यांच्या घराच्याजवळच्या महाविद्यालायात प्रवेश न मिळता तो अतिशय दूर मिळतो. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होते, हा मुद्दा राज पुरोहित यांनी मांडला. त्यावर ‘नेबरहूड स्कुलिंग’ ही संकल्पना सरकारच्या विचाराधीन असल्याचे तावडे म्हणाले. यासंदर्भात  एक समिती स्थापन करण्यात येईल, असे तावडे यांनी सांगितले.