गृह विभागाकडून नियमात बदल

राज्यात पोलीस शिपाई भरतीसाठी शारीरिक चाचणी घेतल्यानंतर लेखी परीक्षा घेतली जायची. आता मात्र, राज्याच्या गृह विभागाने पोलीस शिपाई भरती प्रक्रियेत बदल केला असून गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना पोलीस भरतीमध्ये स्थान मिळावे, यासाठी सर्वप्रथम लेखी परीक्षा घेण्याचे ठरवले आहे. लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांनाच शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरवले जाणार आहे. विशेष म्हणजे, १०० गुणांची शारीरिक चाचणी आता ५० गुणांची करण्यात आली आहे.

२०१२ च्या पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियमावलीत ही सुधारणा करण्यात आली आहे.  ही परीक्षा पूर्वीप्रमाणेच १०० गुणांसाठी व ९० मिनिटांत घेतली जाणार आहे. लेखी परीक्षेच्या अभ्यासक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. १०० गुणांच्या शारीरिक चाचणीत बदल करण्यात आला असून  १०० गुणांऐवजी ती ५० गुणांची होणार आहे. यामधून लांब उडी व पुलअप्स वगळण्यात आले आहेत. ५० गुणांच्या शारीरिक चाचणीत ३० गुणांसाठी १६०० मीटर धावणे, १० गुणांसाठी १०० मीटर धावणे, १० गुणांसाठी गोळाफेक असे एकूण ५० गुण ठेवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, लेखी परीक्षेत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ३५ टक्के, तर इतर मागास प्रवर्गातीत उमेदवारांना किमान ३३ टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. लेखी चाचणीतून एका उमेदवारासाठी पाच जणांची निवड करण्यात येणार आहे. यानंतर शारीरिक चाचणीतून अव्वल ठरलेल्या उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून शारीरिक चाचणीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या निर्णयाला विरोध केला आहे.