राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कथित नोकरभरती घोटाळा चांगलाच भोवला आहे. नोकरभरतीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यामुळे राज्य सरकारने आज त्यांचे निलंबन केले. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी डॉ. माने यांच्या निलंबनाची घोषणा विधिमंडळात केली.
माने यांच्या कार्यकाळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ५३ अधिकाऱ्यांची भरती करण्यात आली होती. या भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. याबाबत सिनेट सदस्य आणि भाजपचे आमदार अतुल सावे यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी माने यांच्या निलंबनाची घोषणा केली.
धनराज माने यांना पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे तावडे यांनी सांगितले. सबंधित अधिकाऱ्यांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यात येईल, असे आदेशही तावडे यांनी दिले आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 6, 2017 7:42 pm