नालासोपाऱ्यातील घटना; प्रसंगावधान राखून रुग्णांना हलवल्याने अनर्थ टळला

विरार : विजय वल्लभ रुग्णालयातील घटनेची पुनरावृत्ती नालासोपारा येथील एका खासगी रुग्णालयात टळली. या रुग्णालयात अतिदक्षता विभागात प्राणवायूवाहिनीची गळती होऊन बिघाड झाला होता. रुग्णालयाने प्रसंगावधान दाखवत उपचार घेत असलेल्या रुग्णांना तातडीने इतर रुग्णालयांत स्थलांतरित केल्याने रुग्णांचे प्राण वाचले आहेत.

नालासोपारा पूर्व प्रगती नगर परिसरात असलेल्या ‘एस एम मल्टीस्पेशालिटी’ रुग्णालयात बुधवारी रात्री १० च्या सुमारास अतिक्षता विभागात अचानक प्राणवायू वाहिनेला गळती सुरू झाली. यावेळी अतिदक्षता विभागात ६ रुग्ण उपचार घेत होते. ही बाब डॉक्टरांच्या लक्षात येता त्यांनी तातडीने इतर रुग्णालयांत फोन करून रुग्ण हलविण्यास सुरुवात केली. यात विनायका रुग्णालयात २ रुग्ण, वेल केअर रुग्णालयात २ आणि सी आणि सी रुग्णालयात २ रुग्ण हलविण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे ‘एस एम मल्टीस्पेशालिटी’ रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. राजू तिगडी यांनी सांगितले.

परवानगी दिली कशी?

सध्या हे रुग्णालयात महापालिकेच्या कोविड रुग्णालयाच्या यादीत आहे. पण या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ७ खाटा आहेत. या खाटा मोठय़ा दाटीवाटीने बसविल्या आहेत. रुग्णालये आणि आरोग्य सेवांसाठी राष्ट्रीय मान्यता मंडळ यांच्या नियमानुसार दोन खाटांमधील अंतर कमीत कमी ४ फूट असणे आवश्यक आहे. असे असतानाही मोठय़ा दाटीवाटीने या खाटा बसविल्या आहेत. त्याचबरोबर या रुग्णालयाचे अग्नी लेखापरीक्षण ९ सप्टेंबर २०२० रोजी झाले आहे.  पण आता पुन्हा लेखा परीक्षण करत असल्याची माहिती या रुग्णालयाने दिली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. पण अशा रुग्णालयांना कोणत्या निकषावर परवानगी दिली हा प्रश्न आहे.

शासकीय यंत्रणा संपर्काबाहेर

सध्या या रुग्णालयात इतर ६ ते ७ रुग्ण उपचार घेत आहेत. नव्याने रुग्ण दाखल करून घेण्याचे रुग्णालयाने थांबविले असून प्राणवायू गळती दुरुस्तीचे काम सुरू आहे. प्राणवायूची गळती होताच रुग्णालयाने महापालिका आयुक्त, वैद्यकीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना या संदर्भात मदतीसाठी रात्री फोन केले पण कुणाचाही संपर्क झाला नाही, असे तिगडी यांनी सांगितले.