मुंबई, ठाणे आणि आसपासच्या भागात काल संध्याकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतूक कोलमडून गेली आहे. मुंबई आणि ठाण्यासाठी रेड अलर्ट असून पुढचे ४८ तास असाच मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

आज सकाळी पावणेआठ वाजेपर्यंत झालेला पाऊस
कुलाबा – २२० मिमी पाऊस
सांताक्रूझ -२५४ मिमी पाऊस
राम मंदिर – १५२ मिमी पाऊस
मिरा रोड – १५२ मिमी पाऊस
महालक्ष्मी – १७२ मिमी पाऊस
विद्याविहार – १५९ मिमी पाऊस
ठाणे आणि उत्तर मुंबईत १५० मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.

हवामानतज्ज्ञ आणि हवामान विभागाचे महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी टि्वट करुन ही माहिती दिली आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. दक्षिण कोकणातही पुढचे ४८ तास मुसळधार पाऊस कोसळेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

बंगालच्या उपसागरात उत्तरेस कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता त्याचबरोबर अरबी समुद्रात पूर्व-मध्यावर किनारपट्टीच्या उत्तरेस चक्रवाती वर्तुळाकार (सायक्लोनिक सक्र्युलेशन) परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये ४ आणि ५ ऑगस्टला काही ठिकाणी अतिमुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानुसार कार्यवाही करण्याचा इशारा (रेड अर्लट) देण्यात आला आहे.

ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्य़ात मंगळवारी काही ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते. तर बुधवारी पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नाशिक, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात मंगळवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.