आजपासून नक्षलवाद्यांचा स्थापना सप्ताह

गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या नक्षलवाद्यांच्या हिंसाचाराच्या पाश्र्वभूमीवर आज  शनिवार, २ डिसेंबरपासून नक्षल्यांच्या ‘पीपल्स लिबरेशन गुर्रिला आर्मी’चा स्थापना सप्ताह सुरू हेात आहे. २ ते ८ डिसेंबर या कालावधीत नक्षलवादी हिंसाचार घडवून आणण्याची शक्यता लक्षात घेता  पोलीस दलाने ‘रेड अलर्ट’जारी केले असून छत्तीसगडच्या कोब्रा बटालियनच्या मदतीबरोबरच सी-६० पथकालाही तैनात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गडचिरोलीत मागील दहा दिवसांपासून नक्षलवाद्यांनी हिंसाचाराच्या माध्यमातून रक्तपात सुरू केला आहे. यात सातजणांचा बळी गेला आहे. यात पाच सामान्य ग्रामस्थांचे बळी गेले असून दोन पोलिस जवान शहीद झाले आहेत. नक्षलवाद्यांचा हिंसाचार बघता स्थापना सप्ताहातही ते हिंसाचार घडविण्याची शक्यता वर्तविली जात आहे. २००४ मध्ये पीपल्स वॉर ग्रुपच्या विघटनानंतर २ डिसेंबर २००५ रोजी पीपल्स लिबरेशन गुर्रिला आर्मी (पीएलजीए)ची स्थापना करण्यात आली होती, तेव्हापासून नक्षलवादी हा स्थापना सप्ताह साजरा करून मोठय़ा प्रमाणात हिंसाचार घडवून आणतात. या सप्ताहाच्या पाश्र्वभूमीवर नक्षलवाद्यांनी दुर्गम व अतिदुर्गम भागात मोठय़ा प्रमाणात पत्रके, पोस्टर, बॅनर लावून लोकांना यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. तसेच सत्ताधारी भाजप सरकारला लक्ष्य केले आहे. राज्य व केंद्र सरकार उद्योगपतींच्या दावणीला बांधले गेले आहेत. त्यामुळे सामान्य आदिवासींकडे दुर्लक्ष झाले असून भाषा व धर्माचे राजकारण चालू असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. नक्षलवाद्यांनी अतिदुर्गम भागात सरकार विरुद्ध ग्रामस्थांना भडकविण्याचे काम सुरू केल्याने तसेच हिंसाचार पाहता गडचिरोली जिल्हा पोलिस दलाने ‘रेड अलर्ट जारी केला आहे.

छत्तीसगड, आंध्रप्रदेश व तेलंगणा या सीमावर्ती भागात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाआहे. छत्तीसगड राज्यातील बस्तर, कांकेर व जगदलपूर या भागातील नक्षली गडचिरोलीत मोठय़ा संख्येने दाखल होण्याची शक्यता लक्षात घेता सी-६० पथकाला तैनात करण्यात आले आहे. सध्या सीमावर्ती भागात नक्षलवादी नेत्यांचे वास्तव्य आहे. त्यामुळे अतिशय बारकाईने सर्व घटनांवर लक्ष ठेवावे अशा सूचना आहेत. नक्षलवादी या काळात पोलिस चौक्या, कंत्राटदारांच्या साहित्याची जाळपोळ, हत्या, पोलिसांची हत्यारे लुटणे, शासकीय व निमशासकीय मालमत्तेची जाळपोळ अशा घटना घडवून आणतात. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळ, सामान्य ग्रामस्थ, कंत्राटदार, पत्रकार, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांनाही सतर्क राहण्याचे आदेश आहेत.

हेलिकॉप्टरने पाळत

गडचिरोली जिल्हय़ात घनदाट जंगल आहे. या जंगलातच नक्षलवाद्यांचे वास्तव्य आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांवर  हेलिकॉप्टरने पाळत ठेवली जात आहे. गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या नक्षली हिंसाचाराच्या पाश्र्वभूमीवर पोलिस महानिरीक्षक कनकरत्नम, विशेष पोलिस महानिरीक्षक शरद शेलार, उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अति. पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी हेलिकॉप्टरने दररोज अतिदुर्गम भागात जावून तेथील माहिती घेत आहेत. तसेच नक्षली हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.