आदिवासी विकास प्रकल्पाचे अप्पर आयुक्त विश्वंभर वरवंटवार, प्रकल्प विकास अधिकारी महेंद्रसिंग खोजरे यांच्या अमरावती, नांदेड व औरंगाबाद येथील निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज छापे घातले, अशी माहिती अकोल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक उत्तमराव जाधव यांनी दिली.
दरम्यान, हे अधिकारी व कंत्राटदार शब्बीर अली याच्याही विरुद्ध याच प्रकरणी धारणी येथे पोलीस ठाण्यात आज गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आदिवासी मुलांच्या वसतीगृहात व आश्रमशाळेत भारनियमनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर दुष्परिणाम होतो, असे कारण दाखवून ५० जनरेटर संच आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने खरेदी केले. यात या अधिकाऱ्यांनी ७२ लाखांचा भष्टाचार केल्याचे चौकशीअंती उघड झाले आहे. जनरेटर संचासाठी या अधिकाऱ्यांनी महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्र कं पनीकडून जे दर देण्यात आले त्यात प्रती जनरेटरची किंमत १ लाख ७९ हजार ३२ रुपये होती. असे असतांनाही या अधिकाऱ्यांनी व ज्यांना त्यांनी कंत्राट दिले त्या जी.एस.एंटरप्रायजेस या पुरवठादाराने जनरेटर संचांची किंमत वाठवून २ लाख २२ हजार ९८० रुपये दाखवून तशी बनावट कागदपत्रे तयार करून हे ५० जनरेटर संच खरेदी केले. या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दोन वर्षांपूर्वीच मिळाले होते, पण या विभागाने दोन वर्षांत चौकशी का केली नाही, हा एक प्रश्न निर्माण झाला आहे. नवे उपअधीक्षक उत्तमराव जाधव यांनी मात्र हे प्रकरणाची तातडीने चौकशी केली व आता कोठे गुन्हे दाखल झाले आहेत.