News Flash

कॉम्रेड शरद पाटील यांना अखेरचा ‘लाल सलाम

जातीव्यवस्थेविरोधात प्रखर लढा देणारे ज्येष्ठ विचारवंत, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व प्राच्यविद्यापंडित काँम्रेड शरद पाटील यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी येथील महापालिकेच्या

| April 14, 2014 02:01 am

जातीव्यवस्थेविरोधात प्रखर लढा देणारे ज्येष्ठ विचारवंत, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व प्राच्यविद्यापंडित काँम्रेड शरद पाटील यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी येथील महापालिकेच्या स्मशानभूमीत अब्राम्हणी पध्दतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. कॉम्रेड यांना अखेरचा लाल सलाम देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कॉ. पाटील यांचे ८७ व्या वर्षी शनिवारी रात्री देहावसान झाले. काही दिवसांपासून ते आजारी होते. पाटील यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी रात्रीच देशभरातून धुळ्याकडे येणे सुरू केले होते. रविवारी सायंकाळी पाच वाजता वाडीभोकर रस्त्यावरील ‘असंतोष’ या निवासस्थानापासून अंत्ययात्रेस सुरूवात झाली. सजवलेल्या ट्रॅक्टरवर कॉ. पाटील यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. अंत्ययात्रेत सत्यशोधक विद्यार्थी संघटनेतर्फे क्रांतिकारक गीते गाण्यात येत होती. ‘कॉम्रेड शरद पाटील को लाल सलाम लाल सलाम’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता. त्यांच्या पत्नी कॉ. नजुबाई गावित, मुले प्रा. नचिकेत आणि प्रसिद्ध शिल्पकार सरमद पाटील तसेच मुलगी सुजाता, सूना व नातवंडे हे कसेबसे आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होते. अंत्ययात्रा जसजशी स्मशानभूमीजवळ येऊ लागली. तसतशा घोषणा वाढत गेल्या. स्मशानभूमीत ‘बामसेफ’तर्फे कॉम्रेडांना मानवंदना देण्यात आली. कॉ. शरद पाटील यांच्या पत्नी कॉ. नजूबाई गावित यांनी प्रा. नचिकेत व सरमद या दोघा मुलांसह अग्निडाग दिला. त्यावेळी उपस्थितांना अश्रू अनावर झाले.
धुळे तालुक्यातील कापडणे हे पाटील यांचे मूळ गाव. १७ सप्टेंबर १९२५ रोजी जन्मलेल्या पाटील यांनी आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत सत्यशोधक कार्य, पुरोगामी विचारांची चळवळ आणि लिखाण अविरतपणे सुरू ठेवले. १९४५ मध्ये युद्धोत्तर पहिल्या विद्यार्थी संपात त्यांनी शिक्षण त्याग करून हिंदी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. १९६४ मध्ये हा पक्ष दुभंगल्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात ते दाखल जाले. १९७८ मध्ये या पक्षाचा राजीनामा देऊन त्यांनी स्वतंत्र सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. १९८२ ते ९९ या कालावधीत ‘मार्क्सवादी’ या मासिकाचे त्यांनी संपादन केले. आपल्या सत्यशोधकी चळवळीच्या अनुषंगाने १९८७ मध्ये धुळे जिल्ह्यातील साक्री येथे दलित-आदिवासी ग्रामीण संयुक्त साहित्य महासभा स्थापन करून कॉ. पाटील यांनी संमेलन घेतले होते. दलित, आदिवासी आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनांच्या माध्यमातून वाचा फोडली.विपूल अशी ग्रंथसंपदा हे कॉ. शरद पाटील यांचे एक वैशिष्टय़े. त्यांचे वैचारिक साहित्य अवघ्या जगाचे लक्ष वेधणारे ठरले. दास शुद्रांची गुलामगिरी हा खंड अधिक गाजला. अब्राम्हणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र, मार्क्सवाद फुले-आंबेडकरवाद, जाती व्यवस्थापक सांमती सेवकत्व, जात्यंतक भांडवलदारी, लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पूर्ती, शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण ? महंमदी ही ब्राह्मणी, या त्यांच्या ग्रथांनी केवळ साहित्य विश्वात नव्हे तर, सामाजिक क्षेत्रातही वादळ उठविले. स्मशानभूमीत श्रध्दांजली वाहताना प्रख्यात विचारवंत व लेखक रावसाहेब कसबे यांनी कॉ. शरद पाटील यांच्या निधनाने आपल्या अस्तित्वाचा एक भागच गेल्याची भावना व्यक्त केली. खेडय़ातला एक माणूसही जागतिक पातळीवरील विचारवंत होऊ शकतो. हे कॉ. पाटील यांनी दाखवून दिल्याचे ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2014 2:01 am

Web Title: red salute comrade sharad patil
Next Stories
1 सिंधुदुर्गात पवारांच्या सभेवर सामूहिक बहिष्कार
2 मनसे-भाजप समझोत्यामुळे शिवसेनेची फरफट -मुख्यमंत्री
3 मोदींची हुकुमशाही मार्गाने वाटचाल
Just Now!
X