उस्मानाबादमध्ये स्वतंत्र विद्यापीठ निर्मितीबाबत प्रस्ताव सादर झाला. त्यासाठी दोन बठका झाल्या आणि आता हा प्रस्ताव चक्क बासनात गुंडाळण्यात आला आहे. औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपकेंद्राचे स्वतंत्र विद्यापीठात रूपांतर व्हावे, या मागणीला कुलगुरू डॉ. बी. आर. चोपडे यांनीच आता खोडा घातला आहे. सल्लागार समिती, प्रशासकीय मंडळाच्या रविवारी आयोजित बठकीत स्वतंत्र विद्यापीठ नव्हे तर उपकेंद्र सक्षम करू, असे म्हणत कुलगुरूंनी उस्मानाबादकरांची बोळवण केली.
विद्यापीठ उपकेंद्राच्या सभागृहात ही बठक झाली. कुलगुरू डॉ. चोपडे, कुलसचिव डॉ. गणेश मंझा, लेखाधिकारी डॉ. अझरोद्दीन, उपकेंद्राचे संचालक डॉ. अशोक मोहेकर यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे तथा सिनेट सदस्यही उपस्थित होते. बठकीत स्वतंत्र विद्यापीठाचा विषय आला आणि कुलगुरूंनी उपकेंद्राचा परिसर सक्षम करण्यास वेगवेगळ्या योजनांसाठी निधी, तसेच कर्मचाऱ्यांच्या पदांचे गाजर दाखवून स्वतंत्र विद्यापीठाच्या मागणीची बोळवण केली. मागील दोन महिन्यांपूर्वी स्वतंत्र विद्यापीठासंदर्भात दोन बठका झाल्या. यात मागणीचा अंतिम प्रस्ताव तयार करण्याचा निर्णयही झाला. या दोन बठकांतच स्वतंत्र विद्यापीठाची मागणी दप्तरात बंद झाली. काही मोजक्या संघटनांच्या विरोधामुळे कुलगुरूंनी उस्मानाबाद उपकेंद्राचे स्वतंत्र विद्यापीठ करण्यास नकार दिला. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. अप्पासाहेब हुंबे, स्थायी समितीचे अध्यक्ष प्रा. संभाजी भोसले, सिनेट सदस्य डॉ. डी. व्ही. माने, डॉ. श्रीकृष्ण चंदनशिवे, प्राचार्य डॉ. जे. एस. मोहिते, डॉ. भारत गपाट, नितीन बागल, दत्तात्रय राऊत यांचीही उपस्थिती होती.
उपकेंद्रात सोयी-सुविधांचा ठणठणाट
विद्यापीठाचे उस्मानाबाद उपकेंद्र ऑगस्ट २००४ मध्ये सुरू झाले. मात्र, उपकेंद्राच्या समस्यांचे ग्रहण तप सरले, तरी सुरूच आहे. शहरापासून ६ किलोमीटर अंतरावरील उपकेंद्रात जाण्यास विद्यार्थ्यांना स्वतंत्र वाहनाची व्यवस्था नाही. सेतु सुविधा केंद्राची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांचा प्रश्न रखडल्यामुळे एकूणच कामकाजावर परिणाम होत आहे. अनेक प्राध्यापक, सहायक प्राध्यापक दीर्घ रजेवर आहेत. आधीच रिक्त पदांची संख्या अधिक, त्यात दीर्घ रजेवर जाणारे प्राध्यापक वरचेवर वाढत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पीएच. डी. पूर्वपरीक्षा (पेट) देण्यासाठी विद्यार्थ्यांना थेट औरंगाबाद गाठावे लागते. हा पेपर सकाळी लवकर असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक दिवस अगोदर जाण्याखेरीज पर्याय नसतो. उपकेंद्रात उपलब्ध विभाग, विषयांव्यतिरिक्त इतर कोणत्याही विषयाच्या पीएच. डी.च्या तोंडी परीक्षा घेतल्या जात नाहीत. विशेष म्हणजे एमसीए अभ्यासक्रमासाठी मागील ५ वर्षांपासून एकही स्टाफ नियुक्त नाही. मात्र, दरवर्षी प्रवेश प्रक्रिया नियमित सुरू आहे.
‘स्वतंत्र विद्यापीठासाठी आग्रही’
रविवारी आयोजित बठकीत कुलगुरूंनी स्वतंत्र नव्हे, सक्षम उपकेंद्र करू असा प्रस्ताव मांडला. त्याला सर्वानी अनुमती दिली. याचा अर्थ स्वतंत्र विद्यापीठासाठी पाठपुरावा कमी होणार नाही. स्वतंत्र विद्यापीठासाठी आम्ही आग्रही आहोतच. तसेच उपकेंद्र परिसरात अनेक सोयी-सुविधा निर्माण होणेही गरजेचे आहे. कुलगुरूंनी मोठय़ा प्रमाणात निधी आणि विविध विभागांच्या रिक्त जागांसाठी पदनिर्मिती करणार असल्याचे सांगितले. सुमारे १७५ नवीन पदे उपकेंद्रास मंजूर झाल्यास स्वतंत्र विद्यापीठासाठी ती पूरक बाब आहे. या अनुषंगाने उपकेंद्र स्वतंत्र विद्यापीठाप्रमाणे सक्षम व्हायला हवे. या बरोबरच अनेक वर्षांपासून असलेली विद्यापीठाची मागणीही आम्ही सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया स्थायी समितीचे अध्यक्ष प्रा. संभाजी भोसले यांनी व्यक्त केली. उपकेंद्रातील गरसोयी, तसेच उपाययोजनांबाबत कुलगुरूंना निवेदन देण्यात आले.