05 March 2021

News Flash

औरंगाबाद शहरासह उद्योगांच्या पाणीपुरवठय़ात १० टक्के कपात

जायकवाडी जलाशयात केवळ ७.५८ दलघमी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याने औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्य़ांतील जायकवाडी जलाशयावर अवलंबून असलेल्या औद्योगिक आणि घरगुती पाणीवापरात १० टक्के कपात करण्याचा

| July 14, 2015 01:10 am

जायकवाडी जलाशयात केवळ ७.५८ दलघमी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याने औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्य़ांतील जायकवाडी जलाशयावर अवलंबून असलेल्या औद्योगिक आणि घरगुती पाणीवापरात १० टक्के कपात करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी वीरेंद्रसिंग यांनी सोमवारी घेतला. अस्तित्वात असलेला पाणीसाठा धरण परिसरातील शेतीसाठी होऊ नये, म्हणून या भागात दोन तास अतिरिक्त भारनियमन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जायकवाडी जलाशयातून औरंगाबाद, जालना व अहमदनगर जिल्ह्य़ांतील गावांना पाणीपुरवठा केला जातो. तसेच ४५ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना या जलाशयावर अवलंबून आहेत.
मराठवाडय़ात अत्यल्प पाऊस झाल्याने दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. मोठा पाऊस येत नाही, तोपर्यंत पाणीवापरावर निर्बंध घालणे आवश्यक होते. या अनुषंगाने जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी सल्लामसलत केली. त्यानंतर पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला. ३१ जुलै रोजी पुन्हा एकदा पाणी कपातीसंदर्भात फेरनियोजन करण्यासाठी बैठक घेतली जाणार आहे. काटकसरीने पाणी वापरण्याची गरज असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
मराठवाडय़ात मोठा अवकाळी पाऊस झाला. मृग नक्षत्रातही झालेल्या पावसामुळे जायकवाडी जलाशयात एक टक्का पाण्याची वाढ झाली होती. येत्या ४ दिवसांत धरणाची पाणीपातळी मृतसाठा गाठणार असल्याने पाण्याच्या वापरावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला. औरंगाबादेत मोठय़ा प्रमाणात सुरू असणाऱ्या उद्योगांना याचा फटका बसू शकेल. शहरातील पाणीपुरवठा आधीच विस्कळीत आहे. त्यात पुन्हा १० टक्के पाणीकपात झाल्याने पाण्याची ओरड वाढण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील काही भागात रात्री दोन वाजता पाणी सोडले जाते. अशातच पाणीकपातही लागू होणार आहे.
दरम्यान, कमी पाऊस झाल्याने मराठवाडय़ातील आठही जिल्ह्य़ांत झालेली ७४ टक्के पेरणी वाया जाण्याची शक्यता आहे. पिके करपू लागली आहेत. मराठवाडय़ात खरीप हंगामात ३२ लाख ५३ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाल्याची नोंद सरकारदरबारी आहे. बीड, उस्मानाबाद, लातूर व परभणी या ४ जिल्ह्य़ांत गंभीर स्थिती असून पिकांचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2015 1:10 am

Web Title: reduction 10 percent water supply in aurangabad industries with city
टॅग : Aurangabad,City
Next Stories
1 शिवसेनेकडून आशिष शेलार पुन्हा लक्ष्य, पिसाळलेल्या कुत्र्याची उपमा
2 ‘पापा’ उल्लेख केला नसता तर बरे वाटले असते – पंकजा मुंडे
3 सिंहस्थ कुंभमेळ्याचे उद्या ध्वजारोहण
Just Now!
X