राज्याच्या अन्य भागांच्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यतील करोना संशयित रूग्णांच्या संख्येत घट झाली असून जिल्हा शासकीय रूग्णालयात एकूण १५ रूग्ण वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्यात आले आहेत. मंगळवारच्या तुलनेत (१७) दोन रूग्ण कमी झाले आहेत.

करोना संसर्गाबाबतच्या चाचणीसाठी  एकूण ३४ नमुने पाठविण्यात आले होते. त्यापैकी २ नाकारण्यात आले असून १० नमुन्यांचा अहवाल  बाकी  आहे. २१ अहवाल नकारात्मक आले  आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयात बुधवारी १५ संशयित निगराणीखाली आहेत. तर ६३९ जणांचे घरी अलगीकरण करण्यात आले आहे.

करोनाचा संसर्ग वाढत चालल्याने शासनाने आजपासून २१ दिवस लॉकडाउन केले आहे. दिवसेंदिवस संशयितांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे शासनाने संचारबंदी अधिक कडक केली आहे. अन्य जिल्ह्यंमध्ये करोना संशयितांचे प्रमाण वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसत असले तरी रत्नागिरी जिल्हा त्याला अपवाद ठरत आहे.

दरम्यान, गेल्या १८ मार्च रोजी मेंगलोर एक्स्प्रेसमधून एका करोनाबाधित रुग्णाने प्रवास केल्याचे उघडकीस आले आहे. रत्नागिरीतील  त्याच डब्यातून प्रवास केलेल्या ४ जणांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या १५ वर पोचली आहे.

पुणे- मुंबईहून ८ मार्चनंतरच्या काळात रत्नागिरी जिल्ह्यत आलेल्या नागरिकांना सक्तीने स्वत:च्या घरात राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याचा भंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्यासमवेत स्वयंसेवी संस्थांच्या बुधवारी  झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार या संस्थांचे कार्यकर्ते अत्यावश्यक अन्नधान्य, भाजीपाला, औषधे इत्यादी सामान नागरिकापर्यंत घरपोच करणार आहेत. मात्र ते दुकान संबंधित नागरिकांच्या घराजवळ असणे गरजेचे आहे.

मुंबईहून कोकणात येण्यासाठी चाकरमानी वेगवेगळे प्रयत्न  करत आहेत. रस्ते वाहतूक बंद ठेवण्यात आल्यामुळे काही दुचाकी घेऊ न तर काही मासेमारी नौकांचा आधार घेत असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यादृष्टीने प्रशासन लक्ष देऊ न आहे. मुंबईतील एक जोडपे घरी अलगीकरण करून ठेवले असताना रत्नागिरीत आले असल्याची माहिती मिळताच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी त्या दाम्पत्याला ताब्यात घेण्याबाबत पोलिसांना सूचना केली.

पोलीस त्यांना पुन्हा मुंबईला रवाना करणार होते. परंतु त्यामुळे संसर्ग वाढू शकतो, हे लक्षात घेऊ न सध्या जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण केंद्रामध्ये ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

घरी सक्तीच्या विश्रांतीसाठी शिक्का मारलेली कोणीही व्यक्ती बाहेर फिरताना दिसल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षात ७०५७२२२२३३ हा व्हॉट्सअप क्रमांक,  नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२२२३३ व २२६२४८, आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रात, पोलीस यंत्रणा अथवा ग्रामपातळीवर ग्राम कृती दलाना देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.