महापालिकेकडून औषध खरेदीच्या तरतुदीत कपात

शहरातील डासांची समस्या वाढत असताना महापालिका प्रशासनाने पुढील आर्थिक वर्षांत जंतूनाशक आणि औषध फवारणीच्या खर्चात कपात केली आहे. चालू आर्थिक वर्षांत औषध खरेदीसाठी दोन कोटी रुपयांची तरतूद होती. मात्र पुढील आर्थिक वर्षांत त्यात कपात करून अवघ्या ५० लाखांवर आणण्यात आली आहे. एकीकडे कपात केली असताना शहरातील धूर आणि औषध फवारणी होत नसल्याने सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनीच प्रशासनाला धारेवर धरले.

साफसफाई विभागाकडून शहरांतर्गत औषध फवारणी केली जाते. २०१८-१९ या वर्षांत पालिकेने एकात्मिक किटक निर्मूलन व्यवस्थापन प्रस्ताव मंजूर केला होता. औषध खरेदी करून जंतूनाशक आणि धूरफवारणी करण्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद केली होती. आता २०१९- २० या आर्थिक वर्षांत यात कपात करून अवघ्या ५० लाख रुपयांची तरतूद केल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. मात्र धूर फवारणी आणि जंतू नाशकांची फवारणी केली जात नसल्याने प्रदूषण आणि रोगराईचे प्रमाण वाढत आहे. नालेसफाई झाल्याने पानवेलीच्या खालील, गाळाखालील डास सर्वत्र पसरले आहे. नाले, डबके, तलाव या ठिकाणी औषध फवारणी करण्याचे ठरले असताना तरतूद कमी का केली, असा सवाल गटनेत्या किरण चेंदवणकर यांनी केला आहे.

औषधेच नाही, फवारणीही नाही

शहरातील डासांचे व कीटकनाशकांचे प्रमाण रोखण्यासाठी एकात्मिक कीटक निर्मुलन व्यवस्थापन या पद्धतीचा वापर करून कामाची सुरवात करण्यात आली होती. यामध्ये तांत्रिक औषध फवारणी, जैविक या पद्धतीचा वापर केला जाणार होता. त्यामध्ये औष्णिक धुणीकरण करून अळ्या, कीटकनाशक, डास यांच्या निर्मूलनासाठी फवारणीचा, पाण्यात गप्पी मासे सोडणे अशा उपाययोजना करण्यात येणार होत्या. मात्र शहरात औषध फवारणी होत नसल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाच्या नगरेसवकांनी केला. शहरात डासांचा उपद्रव वाढतच आहे, असे नगरसेवक अजीव पाटील यांनी सांगितले. दररोज औषध फवारणी करण्यात यावी, असे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले होते. मात्र दररोज फवारणी होत नाही. औषध फवारणीसाठी पालिका मोठय़ा प्रमाणात खर्च करत असते. त्यामुळे दररोज औषध फवारणी झाली पाहिजे, असे पाटील यांनी सांगितले.

सभागृह नेते फ्रान्सिस डिसोजा (आपटे)यांनीही शहरातील औषध फवारणीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. पालिकेकडे औषधेच नाहीत आणि फवारणी होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. महापलिकेने औषध फवारणीसाठी अर्थसंकल्पात मोठय़ा रक्कमेची तरतूद केली आहे. त्यासाठी त्याप्रमाणे औषध फवारणीचेही काम झाले पाहिजे, तरच शहरातील डासांचे प्रमाण कमी होईल, असे त्यांनी सांगितले. शहरात होणारी औषध फवारणी १५ दिवसांतून एकदा होत असते. त्यामुळे शहरात डासांचा उपद्रव वेगाने वाढत आहे. त्यासाठी औषध फवारणी ८ दिवसांतून एकदा करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

शहरात औषध फवारणीसाठी लागणारी जी औषधे आहेत, ती उपलब्ध झाली आहेत. त्यासाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध करून तात्काळ वसई-विरार शहरात एकात्मिक डास निर्मूलन या उपक्रमाच्या माध्यमातून औषध फवारणीची सुरुवात करण्यात येणार आहे.

माधव जवादे, शहर अभियंता, महापालिका