राष्ट्रवादी काँगेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी केलेल्या जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या फेररचनेमुळे जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजीला पुन्हा उधाण आले आहे. जिल्ह्य़ातील जाधव यांचे परंपरागत पक्षांतर्गत विरोधक पालकमंत्री उदय सामंत आणि चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांच्या समर्थकांना फेररचनेत वेचून दूर करण्यात आल्याची या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांची भावना आहे. सामंत यांचे खंदे समर्थक बाबू म्हाप यांना प्रथम राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदावरून हटवून प्रदेशाध्यक्षांचे समर्थक राजू आंब्रे यांना नेमण्यात आले. त्यापाठोपाठ दोनच दिवसांनी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसची राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम आणि राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बाबाजी जाधव यांना डच्चू देण्यात आला.
पालकमंत्री सामंत यांनी अद्यापपर्यंत संयमाची भूमिका घेत जाधव यांच्यावर थेट टीका केलेली नाही. पण कदम यांनी अतिशय उद्विग्न होऊन पक्षाच्या सदस्यत्वाचाच राजीनामा दिला आहे. त्यामुळे तालुक्यातील त्यांचे कार्यकर्तेही बिथरले आहेत. कदम यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले. त्यापैकी बहुसंख्य नगरसेवक कदम यांचे अनुयायी आहेत. मात्र सध्या त्यांनी कदम यांच्याच सूचनेनुसार सबुरीचे धोरण स्वीकारले आहे. ही तालुक्यातील वादळापूर्वीची शांतता मानली जात आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या वतीने काल चिपळूणमध्ये झालेल्या मेळाव्यात पक्षाचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी कदम यांना शिवसेनेत येण्याचे जाहीर निमंत्रण दिले. पण कदम यांनी भावी वाटचालीबाबतचे कोणतेही पत्ते अजून उघड केलेले नाहीत. आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उफाळलेला हा असंतोष जिल्ह्य़ाच्या राजकारणावर किती प्रभाव टाकेल, याबाबत राजकीय वर्तुळात कुतूहल आहे. कदम यांच्या पुढील कृतीवरूनच त्याबाबतचे चित्र स्पष्ट होईल, अशी अपेक्षा आहे.