ऑर्केस्ट्रा बारची अचानकपणे तपासणी करण्यासाठी गेलेल्या अक्कलकोटच्या तहसीलदारांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले अक्कलकोटचे काँग्रेसचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांचे बंधू तथा अक्कलकोट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शंकर म्हेत्रे यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज सोमवारी सोलापूरच्या न्यायालयाने फेटाळला. मात्र या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी येत्या १५ मे रोजी होणार आहे.
गेल्या शुक्रवारी मध्यरात्रीनंतर तहसीलदार गुरूलिंगप्पा बिराजदार (३८) हे दुधनी येथील फुट्री ऑर्केस्ट्रा बारमध्ये गेले असता बारचे मालक शंकर म्हेत्रे यांनी बिराजदार यांना, तपासणी करणारे तुम्ही कोण, असा जाब विचारत त्यांना बेदम मारहाण केली होती. त्यांचा गळा आवळून त्यांचा खुनाचाही प्रयत्न केला होता. या प्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात शंकर म्हेत्रे यांच्या विरोधात खुनी हल्ला करणे, शासकीय कामात अडथळा आणणे, मारहाण करणे, शिवीगाळ व खुनाची धमकी देणे आदी आरोपाखाली गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी म्हेत्रे हे लवकरच शरण आले नाहीत तर त्यांच्या मालकीची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. या पाश्र्वभूमीवर म्हेत्रे यांनी दाखल केलेल्या अंतरिम अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी सोमवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. डी. अग्रवाल याच्या न्यायालयात झाली. मात्र अंतरिम अटकपूर्व जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला. तर अटकपूर्व जामीन अर्जावर पुढील सुनावणी येत्या १५ मे रोजी निश्चित करण्यात आली आहे. या प्रकरणी म्हेत्रे यांच्यातर्फे अॅड. व्ही. डी. फताटे व अॅड. विक्रम फताटे हे काम पाहत आहेत.
दरम्यान, अक्कलकोट तालुक्यातील तलाठी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनानुसार तलाठय़ांनी तहसीलदारांवर शंकर म्हेत्रे यांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून काम केले. म्हेत्रे यांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तलाठी संघटनेने केली आहे. तर याउलट, म्हेत्रे यांच्या समर्थनासाठी म्हेत्रे समर्थकांनी तहसीलदार बिराजदार यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी करीत अक्कलकोटमध्ये मोर्चा काढला. भीमाशंकर कापसे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.