भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा पुलवामा हल्ल्यासंदर्भातला व्हायरल झालेला व्हिडिओ बनावट असल्याचा दावा भाजपाने केला आहे. प्रसिद्धीमाध्यमांनी या व्हिडिओबाबत शहानिशा करावी आणि बनावट व्हिडिओ तयार करुन बदनामी करण्याच्या कारस्थानाला बळी पडू नये असे भाजपाचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने टि्वट केलेल्या पुलवामाचा संदर्भ असलेल्या त्या व्हिडिओबद्दल भाजपाने पत्रककाढून स्पष्टीकरण दिलं आहे.

पुलवामा हल्ल्याचा संदर्भ देताना दानवेंनी जवानांऐवजी अतिरेकी असा उल्लेख केला. ‘पाकिस्तानने आपले ४० अतिरेकी मारले. त्यामुळे देशात प्रचंड रोष तयार झाला’ असे दानवे या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोलापूरमध्ये भाषण करताना जे वक्तव्य केले त्या व्हिडिओमध्ये मोडतोड करुन प्रदेशाध्यक्षांविषयी गैरसमज निर्माण करणारी बनावट व्हिडिओ क्लिप एका राजकीय पक्षाने सोशल मीडियामध्ये सोमवारी दुपारी व्हायरल केली.

तीन दिवसांमध्ये आपल्या सैन्याने पाकिस्तानात जाऊन आपल्या जवानांनी त्याठिकाणी चारशे अतिरेकी मारले आणि हे दाखवून दिले की, आमचे सैनिक हे काही कमी नाही हे दानवेंचे मूळ वक्तव्य आहे. पण बोलताना घेतलेल्या पॉजचा दुरुपयोग करुन बनावट व्हिडिओ तयार करुन बदनामीचा प्रयत्न करण्यात आला असा भाजपाने दावा केला आहे.