राज्यातील ६० हजार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांकडे शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने २० जानेवारी रोजी राज्यातील आठही शिक्षण उपसंचालक कार्यालयांवर विभागवार मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांकडून एकत्रितपणे महाविद्यालयनिहाय संपूर्ण बहिष्काराची नोटीस संलग्न महाविद्यालयाच्या प्राचार्यामार्फत विभागीय शिक्षण मंडळांना देण्यात येणार असल्याची माहिती राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष प्रा. संजय शिंदे यांनी दिली.
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी फेब्रुवारी २०१३ च्या बारावी उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेले बहिष्कार आंदोलन मागे घेताना राज्याचे मुख्य सचिव जे. एस. सहारीया यांनी राज्य शासनाच्या वतीने नऊ मागण्यांवर तीन महिन्यांत तातडीने निर्णय घेतला जाईल, असे लेखी आश्वासन महासंघास १३ मार्च २०१३ रोजी दिले होते; परंतु त्यानंतर नोव्हेंबपर्यंत कोणताही निर्णय शासनाकडून न झाल्याने डिसेंबरमध्ये महासंघातर्फे तीन वेळा इशारा आंदोलन करण्यात आले; परंतु त्याचीही शासनाकडून दखल घेतली न गेल्याने महासंघाने राज्य शासनास फेब्रुवारी २०१४ इयत्ता बारावीच्या परीक्षेवर बहिष्काराची नोटीस दिली आहे. बहिष्कार आंदोलनाची सुरुवात म्हणून प्रथम शिक्षण उपसंचालक कार्यालयांवर मोर्चा काढण्यात येणार आहे.
नाशिक विभागातील शिक्षकांनी सोमवारी दुपारी १२ वाजता नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयाजवळ जमावे व मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन महासंघाचे कार्याध्यक्ष प्रा. संजय शिंदे, नाशिक विभागाचे अध्यक्ष प्रा. बी. ए. पाटील, नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रा. के. एन. अहिरे आदींनी केले आहे.