अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच संदीप सिंह याचं नाव समोर आल्यानं वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. संदीप सिंह याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर बायोपिक बनवला होता. त्यामुळे संदीप सिंहचा भाजपाशी संबंध असल्याचा आरोप काँग्रेसह काही जणांनी केला असून, त्याची चौकशी करण्याच्या मागणीनं जोर धरला आहे. यासंदर्भात तक्रारी दाखल झाल्यानंतर संदीप सिंह आणि भाजपातील संबंधांचीही सीबीआय चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याविषयी महत्त्वाची माहिती दिली.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये रोज नवीन माहिती समोर येत असतानाच त्यावरून राजकारणही चांगलेच तापले आहे. या प्रकरणामध्ये अंमली पदार्थांचा उल्लेख झाल्यानंतर अंमलीपदार्थ विरोधी पथकाकडूनही गुन्हा दाखल करण्यात आला. सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती व तिचा मित्र संदीप सिंह यांनी सुशांतला अंमली पदार्थ दिल्याचा आरोप काही व्हॉ्सअपवरील संवादांचा आधार घेत करण्यात आला. त्यावरून भाजपानं आरोप केले होते. त्यानंतर काँग्रेससह काहीजणांनी संदीप सिंह आणि भाजपा यांचे संबंध असल्याचा दावा केला आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणातच संदीप सिंह आणि भाजपा यांच्यातील संबंधाचा नवा मुद्दा उपस्थित झाला आहे. याप्रकरणी बोलताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवणारा संदीप सिंह आणि भाजपा यांचे संबंध असून त्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. काही जणांनी तशी विनंतीही केली आहे. त्याचा संबंध बॉलिवूड आणि ड्रग्ज प्रकरणाशीही आहे. त्यामुळे या प्रकरणाचीही चौकशी करण्याची विनंती मी सीबीआयकडे करणार आहे,” असं देशमुख यांनी सांगितलं.

संदीप सिंहचं नाव समोर आल्यानंतर भाजपाचे आमदार राम कदम यांनी बॉलिवूडमधील अंमली पदार्थांच्या रॅकेटची चौकशी करावी, अशी मागणी केली होती. कदम यांनी मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात पत्रही पाठवलं होतं. त्यावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा संदीप सिंहबरोबरचा फोटो पोस्ट करत या प्रकरणामध्ये राज्य सरकारने भाजपा अँगलनेही तपास करावा, अशी मागणी केली होती.