19 November 2019

News Flash

जन्मभूमी सांगलीशी राजा ढाले यांचे अखेपर्यंत नाते

राजा ढाले यांचे मूळ गाव सांगलीजवळील नांद्रे. त्यांचे प्राथमिक शिक्षण नांद्रे आणि इस्लामपूर येथे झाले.

सांगलीत १९८७ मध्ये झालेल्या मास मूव्हमेंटच्या राज्य अधिवेशनात बोलताना राजा ढाले.

दिगंबर शिंदे

आंबेडकरी चळवळीतील थोर विचारवंत आणि सांगलीचे सुपुत्र राजा ढाले यांचे निधन झाल्यामुळे चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये शोक व्यक्त होत आहे. त्यांनी अखेपर्यंत जन्मभूमी असलेल्या सांगलीशी आपले नाते जोडले होते. जिल्ह्य़ातील पुरोगामी चळवळीला वैचारिक बठक ढाले यांच्या मार्गदर्शनामुळे लाभली असल्याचे प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांनी सांगितले.

राजा ढाले यांचे मूळ गाव सांगलीजवळील नांद्रे. त्यांचे प्राथमिक शिक्षण नांद्रे आणि इस्लामपूर येथे झाले. १९५६ मध्ये पाचवीनंतर त्यांना शिक्षणासाठी चुलत्यांनी मुंबईला नेले. त्यानंतर ते मुंबईतच स्थायिक झाले असले तरी जन्मभूमी असलेल्या सांगलीशी त्यांची नाळ कायम जुळलेली होती.

दलित पँथरची स्थापना झाल्यानंतर ढाले यांनी १९७३-७४ मध्ये सांगलीत याची शाखा सुरू केली होती. त्या वेळी त्यांच्यासमवेत डी. एल. थोरात, एन. बी. कांबळे, प्रताप गोंधळे, प्रमोद सारनाथ, गौतमीपुत्र कांबळे, दिलीप सासणे, प्रसनजित बनसोडे आदी मंडळी या पँथर संघटनेच्या संपर्कात आली. पँथरच्या बरखास्तीनंतर त्यांनी १९७८ मध्ये मास मूव्हमेंटची स्थापना केली होती. याची सर्वप्रथम शाखा सांगलीत सुरू झाली. मास मूव्हमेंटचे राज्य अधिवेशन १९८७ मध्ये बौद्ध भिखु भदंत डॉ. आनंद कौशल्यायन यांच्या उपस्थितीत झाले होते. या वेळी ढाले यांच्या साक्षीने दीक्षा कार्यक्रमही झाला होता.

फुले, आंबेडकर शताब्दी साहित्य संमेलन सांगलीत घेण्यात आले होते. १९९३ आणि २०११ मध्ये झालेल्या या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ढाले यांनी स्वीकारले होते. २०१० मध्ये त्यांचे जन्मगाव असलेल्या नांद्रे या गावाने त्यांचा नागरी सत्कारही केला होता. गेल्या महिन्यापर्यंत त्यांचा सांगलीशी संपर्क होता, असे श्री. कांबळे यांनी सांगितले.

आज सांगलीत सुरू असलेल्या पुरोगामी आणि आंबेडकरी चळवळीची वैचारिक बठक तयार करण्यात ढाले यांच्या विचाराचा प्रभाव मोठा असल्याचेही दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. मानवतेला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या थोर विचारवंत, साहित्यिकाला जिल्हा मुकला असल्याची प्रतिक्रिया चळवळीतील मान्यवरांनी व्यक्त केली आहे.

First Published on July 17, 2019 1:48 am

Web Title: relationship to the end of the birthplace of raja dhale abn 97
Just Now!
X