निकटच्या नात्यातील एका अविवाहित तरुणीशी सलगी वाढवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी विजय मधुकर हाक्के (४७, रा. भाग्यलक्ष्मी पार्क, जुळे सोलापूर) यास फौजदार चावडी पोलिसांनी अटक केली आहे. हाक्के हा पीडित तरुणीला सोलापूरसह कोल्हापूर येथे नेऊन गेली चार वर्षे बलात्कार करीत होता, अशी माहिती फिर्यादीत नमूद करण्यात आली आहे.
दक्षिण कसब्यातील एका अपार्टमेंटमध्ये राहणा-या २४ वर्षांच्या अविवाहित तरुणीचा विजय हाक्के हा निकटचा नातेवाईक आहे. नात्यामुळे तो सदर तरुणीच्या घरात नेहमी येत असे. तिच्याशी सलगी वाढवून त्याने प्रथम तिचा विनयभंग केला व नंतर तिला मोदीखाना येथे आपल्या घरात नेले व तिच्यावर बलात्कार केला. नंतर दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथे स्वत:च्या सासरवाडीत नेऊन तेथेही बलात्कार केला. त्याने सदर तरुणीला कोल्हापूर येथे नेले व तेथील एका लॉजवरील मुक्कामात पुन्हा बलात्कार केला. प्रत्येक वेळी घडलेला प्रकार कोणालाही सांगितला तर अंगावर अ‍ॅसिड टाकून खून करण्याची धमकीही त्याने दिली. अखेर वैतागून पीडित तरुणीने आपली कैफियत आईसमोर मांडली. त्यानंतर थेट फौजदार चावडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद नोंदविण्यात आली. विजय हाक्के यास अटक करण्यात आली असून, त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
बसचालकाकडून महिलेचा विनयभंग
सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमातील व्हॉल्व्हो बसमधून प्रवास करणा-या एका महिलेचा बसचालकाने विनयभंग केल्याची फिर्याद मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. मोहोळ तालुक्यातील धनकवाडी येथे राहणारी व तालुका पंचायत समिती कार्यालयातील कर्मचारी असलेली ४८ वर्षांची महिला कोंडी गावाकडे जाण्यासाठी मोहोळ-सोलापूर शहरी बसमध्ये चढली. बसमध्ये उभी राहून मोबाइलद्वारे बोलत असताना बसमध्ये टेपवर वाजणा-या गाण्याचा आवाज कमी करा म्हणून तिने विनंती केली. परंतु त्यावरून बसचालक राहुल गुरव (रा. सोलापूर) याने वाद घातला व भांडण काढून सदर महिलेचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
अपंगाची आत्महत्या
हैदराबाद रस्त्यावर जुन्या विडी घरकुलात राहणा-या अनिल वसंत गणपा (३२) या अपंग तरुणाने अपंगत्वाला कंटाळून स्वत:च्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत अनिल याच्या दोन्ही पायांचे पंजे वाकडे होते. शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास त्याने घरात लाकडी वाशाला साडीने गळफास घेऊन आत्महत्येचा मार्ग पत्करला. जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.