मुंबईत अडकून पडलेल्या चाकरमान्यांना विशेष रेल्वे सोडून कोकणात पाठवा, अशी मागणी माजी आमदार तथा काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष माणिक जगताप यांनी केली आहे. कोकणातील अनेक नागरीक मुंबईत अडकून पडले आहेत. जिवाच्या भितीने चालत हे सर्व जण कोकणात दाखल होत आहेत. या पायपीटीमुळे जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांचे हालहाल करण्यापेक्षा त्यांना सुरक्षितपणे कोकणात येऊ द्या अशी मागणी जगताप यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना त्यांनी याबाबतचे निवेदन बुधवारी दिले.

टाळेबंदीमुळे कोकणातील लाखो नागरीक मुंबईत अडकून पडले आहे. मुंबईत वाढणाऱ्या करोनाच्या प्रादुर्भावामुळे हे सर्वजण घाबरले आहेत. छोट्या खोल्यामध्ये अनेकांना वास्तव्य करावे लागत आहेत. त्यामुळे जिवाच्या भितीने हे सर्वजण, रस्ते मार्ग, आणि रेल्वे रुळांवरून चालत निघाले आहेत. दररोज हजारोंच्या संख्येनी लोक, रायगड, रत्नागिरी आणि सिंधूदूर्ग जिल्ह्यात येत आहेत. या पायपीटीत त्यांचे हाल होत आहेत. या पायपीटीत माणगाव आणि महाड दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ज्या प्रमाणे परप्रांतीय मजूरांसाठी विशेष रेल्वे आणि बसेस सोडण्यात आल्या, तशाच रेल्वे गाड्या आणि बसेस मुंबईत अडकलेल्या कोकणवासियांसाठी सोडल्या जाव्या अशी मागणी जगताप यांनी केली आहे.

त्याचबरोबर पनवेल आणि उरण येथे करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. ही परिस्थिती कायम राहिली तर पनवेल येथील कोव्हीड रुग्णालयाची क्षमता अपुरी पडणार आहे. ही बाब लक्षात घेऊन पेण आणि महाड येथे  कोव्हीड रुग्णालये सुरु करण्यात यावी, अशी देखील मागणी त्यांनी केली.