रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या रायगड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी क्रिकेट स्पध्रेत नागोठणे येथे झालेल्या सामन्यात रिलायन्स एनएमडी संघाने कर्जत संघाचा ६६ धावांनी पराभव केला. रिलायन्सच्या शादाब सुमारा याने स्पध्रेतील पहिले शतक झळकावले.
शादाब सुमारा याने झळकावलेले शतक (१०२) त्याला शेखर वाडिवकर (४४) याने दिलेली साथ यामुळे प्रथम फलंदांजी करताना रिलायन्स एनएमडी संघाने ४५ षटकांमध्ये ९ गडी गमावून २३५ धावा केल्या. कर्जतच्या सचिन लांगी याने ३ गडी बाद केले. विजयासाठी आवश्यक असलेल्या धावांचा पाठलाग करताना कर्जतचा डाव ३६ षटकांमध्ये १६९ धावांत संपला. कर्जतच्या सचिन लांगी याने ४७ तर धनंजय ठोंबरे याने ४२ धावा केल्या. शादाब सुमारा याने २५ धावांत ४ बळी घेतले.
पेण येथे झालेल्या सामन्यात अलिबागच्या प्रसाद इलेव्हन संघाने पनवेलच्या मोरया इलेव्हन संघावर २०३ धावांनी दणदणीत विजय मिळवला. सुमित भगत ( नाबाद ९७) व प्रसाद पाटील (९२) यांनी केलेल्या दमदार फलंदाजीमुळे प्रसाद इलेव्हन संघाने ४० षटकांमध्ये २८३ धावा केल्या. प्रफुल्ल पाटील (६ बळी ) व श्रीकांत (४ बळी) यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे मोरया इलेव्हन संघाचा डाव ८० धावांत आटोपला.
नागोठणे येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात खोपोली अ संघाने पनवेल ब संघाचा ८ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पनवेल ब संघाने ११२ धावा केल्या. पनवेलच्या योगेश याने सर्वाधिक ३० धावा केल्या. खोपोलीच्या पुष्कर चव्हाण याने ३ बळी घेतले. भरत सोलंकी, संतोष साळुंखे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. खोपोली संघाने २ गडी गमावून ११४ धावा करून हा सामना जिंकला. अभिषेक श्रीवास्तव याने ३९ धावा केल्या.