वसई : वसई पूर्वेतील ग्रामीण भागात सुरुवातीला केवळ कामण डोंगरीपाडा येथे लसीकरण केंद्र सुरू होते. परंतु येथे येण्यास  अडचणी निर्माण होत होत्या यासाठी गुरुवारपासून नायगाव पूर्वेतील चंद्रपाडा येथेही लसीकरण केंद्र तयार करून लसीकरणास सुरुवात केली आहे.

ग्रामीण भागासाठी कामण आरोग्य केंद्र हे एकमेव असल्याने नागरिकांची मोठी गर्दी  होती.  त्यात अपुऱ्या लशींचा साठा यामुळे काही नागरिकांना परतावे लागत होते. सद्य:स्थितीत चंद्रपाडा- वाकीपाडा या भागांची लोकसंख्या ही २५ हजारांच्या वर आहे. त्यामुळे या भागात आठवडय़ातून एकदा तरी लसीकरण सुरू करावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य कृष्णा माळी यांनी शासनाकडे केली होती. त्यानुसार गुरुवारपासून चंद्रपाडा ग्रामपंचायतीच्या सभागृहात लसीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी १०० जणांना लसीची मात्रा देण्यात आली.  लशींचा साठा उपलब्ध होईल त्याप्रमाणे चंद्रपाडा भागात लसीकरण मोहीम सुरू केली जाईल, असे डॉ. मल्लीनाथ मलगे यांनी सांगितले आहे.

मीरा-भाईंदरला १० हजार लशींचा साठा

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात १० हजार नव्या लशीच्या कुप्या प्राप्त झाल्यामुळे १० केंद्रांवर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात आले आहे. तसेच दुसरी मात्रा घेणाऱ्या नागरिकांना अधिक प्राधान्य देण्यात येत आहे.रविवारी पालिका प्रशासन लशींचा साठा उपलब्ध होण्याच्या प्रतीक्षेत होते. मात्र तो उपलब्ध न झाल्याने मागील चार दिवसांपासून दोनच केंद्र सुरू होती. यामुळे शहराच्या विविध परिसरांत राहणाऱ्या ४५ वर्षांवरील नागरिकांना दुसरा डोस घेण्यासाठी गांधी रुग्णालयात जावे लागत होते.  बुधवारी   कोव्हिशिल्डच्या सात हजार  व १८ वर्षांवरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सिनच्या तीन हजार अशा एकूण १० हजार लशी उपलब्ध करून देण्यात आल्या.    पंडित भीमसेन जोशी रुग्णालय, भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालय, तसेच आयडियल पार्क,  मिरा रोड, विनायक नगर, बंदरवाडी, पेणकर पाडा, काशी गाव, नवघर आणि  उत्तन आरोग्य केंद्रांत लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या केंद्रावर लसीची मात्रा घेण्यासाठी गर्दी केली आहे.