परतीच्या पावसाने जिल्ह्यातील दुष्काळजन्य परिस्थितीला दिलासा मिळाला आहे. या पावसाने खरीप पिकांची हानी होऊन मिळणा-या उत्पन्नाला फटका बसला आहे.
सातारा जिल्ह्याचे मुख्यत्वे दोन भाग पडतात; एक अतिपावसाचा त्यात महाबळेश्वर , पाटण, पाचगणी,वाई,सातारा,जावलीचा समावेश होतो. तर, कमी पावसात माण,खटाव,फलटणचा समावेश होतो. प्रारंभीच्या जूनच्या पावसाने पेरणीस पोषक वातावरण तयार होऊन शेतक-यांनी अंदाजे तीन लाख १७ हजार ३१९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली. मात्र निसर्गाचा अंदाज न आल्याने असलेल्या पाण्याच्या साठय़ात म्हणजे धरण, शेततळी, कृत्रिम जलाशयातील पाण्यात पिके जगवण्याची पराकाष्ठा करावी लागली. त्यात काही पिके आली ,काही कमी प्रतिची तर काही करपून गेली. कमीपावसाच्या भागात ज्वारी, सोयाबीन, भुईमूग, ज्वारी केली जाते, तर जास्त पावसाच्या भागात भात घेतला जातो. पण या वर्षी निसर्गाचे चक्र उलटे फिरल्याने जास्त पावसाच्या विभागात कमी पाऊस पडला त्यामुळे भात, ज्वारीचे अपरिमित नुकसान झाले. याच सुमारास शेतक-यांनी सोयाबीन, भुईमूग, घेवडा जे काही पीक हाती लागले होते ते काढून ठेवले होते. परंतु हस्त नक्षत्राच्या पावसाचा जोर जिल्ह्यात असल्याने शेतक-यांचे नुकसान होत आहे.परतीचा पाऊस रब्बी हंगामाच्या लागवडीसाठी योग्य असला तरी पाण्याचा साठा किती प्रमाणात जलाशय ,शेततळी व धरणात होणार आहे त्यावरच रब्बीच्या पिकांचा जोर रहाणार आहे. परतीचा पाऊस आले व हळदीला तितकासा पोषक नाही, कारण पावसाच्या आधी जमिनीत जी ताप होती ती हळूहळू गार न होता पावसाच्या जोरामुळे ही पिके कुजून जाण्याची शक्यता असते. हा पाऊस ज्यांनी सोयाबीन, घेवडा, मका, ज्वारी काढली आहे व ज्यांना परत पेरणी करायची आहे म्हणजेच फलटण ,माण ,खटाव या भागात ज्वारी पेरणीसाठी अनुकूल आहे.त्यानंतर सातारा ,कोरेगाव,पाटण या भागात ज्वारीची लागण केली जाते. या पावसानंतर तो किती प्रमाणात पडतो यावर गहू व हरभरा यांचे पीक अवलंबून असते. या वर्षी या पावसामुळे थंडीचे प्रमाण अधिक जाणवले तर गव्हाचे पीक चांगले येईल असेही जाणकारांचे मत आहे. त्याच प्रमाणे हा पाऊस ज्यांचा ऊस नोव्हेंबरमध्ये तोडणीस येणार त्यांनाही पोषक आहे .परंतु नुकत्याच झालेल्या वादळी वा-याने ऊस जमिनीवर पडला आहे. थोडक्यात, रब्बी पिकांसाठी आत्ता पडणारा पाऊस लागवडीसाठी योग्य आहे. पावसाचे पाणी शेतकरी कसे साठवतो यावर खरिपात झालेले नुकसान थोडय़ाफार प्रमाणात तो भरुन काढेल.