गरवी कांद्याची आवक वाढल्याने ग्राहकांनाही झळ नाही

पुणे/ नाशिक/ ठाणे</strong> : यंदाच्या हंगामात गरवी (उन्हाळ) कांद्याची लागवड चांगली झाली असून घाऊक बाजारात सध्या कांद्याची मोठय़ा प्रमाणावर आवक होत आहे. आवक वाढून कांदा दरात घट झाल्याने सामान्यांना दिलासा मिळाला असून गतवर्षीच्या तुलनेत घाऊक बाजारात कांद्याला दर चांगले मिळत असल्याने शेतकरीही सुखावले आहेत.

करोनाच्या संसर्गामुळे उपाहारगृहे, खाणावळी बंद आहेत तसेच लग्नसराईवर निर्बंध आहेत. त्यामुळे कांद्याला फारशी मागणी नाही. किरकोळ बाजारात सध्या एक किलो कांद्याची विक्री प्रतवारीनुसार १८ ते २० रुपये किलो दराने केली जात आहे. गेल्या वर्षी करोनाचा संसर्ग वाढीस लागला होता. त्या वेळी राज्यातील बाजार समित्यांचे कामकाज बंद ठेवण्यात आले होते. व्यापाऱ्यांनी बांधावरून कांदा खरेदी केला होता. त्या वेळी शेतकऱ्यांनी सहा ते आठ रुपये किलो दराने कांदा विक्री केली होती. एप्रिल-मेमध्ये परराज्यातून कांद्याची मागणी कमी होते. त्यामुळे कांद्याचे दर कमी होतात, असा अनुभव आहे. यंदा उन्हाळ कांद्याची आवक मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात कांद्याचे दर कमी झाले आहेत, असे निरीक्षण श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी नोंदविले.

घाऊक बाजारात कांद्याची प्रतवारीनुसार अकरा ते तेरा रुपये दराने विक्री केली जात आहे. निर्बंधातही राज्यातील बाजार समित्यांचे कामकाज सुरू आहे. उन्हाळ कांद्याची लागवड चांगली झाली असून आवकही मोठय़ा प्रमाणावर होत आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांच्या तुलनेत घाऊक बाजारात यंदा  चांगले दर मिळाले आहेत.

वाशी बाजारात मोठी आवक

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याची सध्या मोठय़ा प्रमाणावर आवक होत आहे. बाजारात सरासरी दररोज १०० ते १२५ गाडय़ांमधून कांदा विक्रीस पाठविला जात असून कांदा दरात घट झाल्याची माहिती कांदा व्यापाऱ्यांनी दिली. मुंबई, ठाणे, डोबिंवली परिसरात एक किलो कांद्याची विक्री २५ रुपये दराने केली जात आहे.

नाशिकमध्ये लिलाव बंद

नाशिक जिल्ह्य़ात निर्बंधामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज बंद ठेवण्यात आले आहे. १२ मेपासून कांद्याचे लिलाव बंद आहेत. स्थानिक बाजारात सध्या कांद्याची विक्री २० रुपये किलो दराने केली जात आहे.

पुणे जिल्ह्य़ातील आंबेगाव, शिरूर, खेड, मंचर, जुन्नर तालुक्यात उन्हाळ कांद्याची लागवड मोठय़ा प्रमाणावर झाली आहे. हळवी कांद्याच्या तुलनेत उन्हाळ कांद्याचे एकरी उत्पादन दुप्पट होते. हळवी कांद्याचे एकरी उत्पादन शंभर गोणी होते. त्यामुळे सध्याचे दर शेतकऱ्यांसाठी चांगले ठरले आहेत. सध्या बाजारात विक्रीस पाठविण्यात येणारा कांदा मध्यम प्रतीचा आहे. कांदा उत्पादक शेतकरी उच्च प्रतीचा कांदा चाळीत साठवितात. जून महिन्यानंतर कांद्याला चांगले दर मिळतात. त्यामुळे सध्याच्या कालावधीत मोठय़ा प्रमाणावर कांदा साठवणूक केली जाते.

– रितेश पोमण, कांदा व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड

यंदा कांद्याला बऱ्यापैकी भाव आहेत. कांदा लागवडीसाठी एकरी पन्नास हजार रुपये खर्च येतो. एकरी दहा टन कांद्याचे उत्पादन होते. एक किलो कांद्याचा उत्पादन खर्च पाच रुपये येतो. गतवर्षी टाळेबंदीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. घाऊक बाजारात एक किलो कांद्याला पाच रुपये दर मिळाला होता. त्यामानाने यंदा परिस्थिती बरी आहे. घाऊक बाजारात प्रतवारीनुसार एक किलो कांद्याला ८ ते १३ रुपये असा दर मिळाला आहे. शिरूर तालुक्यात कांदा लागवड मोठय़ा प्रमाणावर केली जाते. आमच्या भागातील शेती बारमाही नाही. कांद्यावर शेतकरी अवलंबून आहेत. कांद्याला आणखी दर मिळायला हवेत, अशी शेतक ऱ्यांची अपेक्षा आहे.

–  भाऊसाहेब बबन शेवाळे, कांदा उत्पादक, वरूडे, ता. शिरूर, जि. पुणे</strong>