राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यात ताकद वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकमेकांची उणीदुणी न काढता निष्ठापूर्वक काम करावे, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येथे राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले. पक्षकार्याला वेळ देऊ न शकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिले.
राष्ट्रवादीच्या शहर, जिल्हा पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्राचे वाटप, पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमांचे नियोजन आणि कार्यकारिणीच्या कामाचा आढावा, असे या बैठकीचे स्वरूप होते. या वेळी पंकज भुजबळ, जयंत जाधव, ए. टी. पवार या आमदारांसह जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जयश्री पवार, माजी मंत्री तुकाराम दिघोळे, माजी आमदार दिलीप बनकर, संजय पवार, नरहरी झिरवळ, शहराध्यक्ष शरद कोशिरे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार आदी उपस्थित होते. जिल्ह्यात लवकरच राष्ट्रवादीचा जिल्हास्तरीय मेळावा घेण्यात येणार असल्याचे संकेत भुजबळ यांनी या वेळी दिले. जिल्ह्यात अलीकडे झालेल्या काही निवडणुकीतील निकालाचा त्यांनी आढावा घेतला. भविष्यात काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रितपणे निवडणुका लढविणार असल्याने आपापसात भांडणे योग्य नाही, असा सल्लाही त्यांनी दिला. पक्ष कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या प्रश्नांसाठी आंदोलन केले पाहिजे. लोकांना लढणारे कार्यकर्ते आवडतात. जातीयवादाचे विष कोणी वाढवीत असेल तर त्याला वेळीच रोखा, असे आवाहनही भुजबळ यांनी केले.