औषधाच्या बाटलीवर ते बाद होण्याची एक तारीख लिहिलेली असते. त्यानंतर ते औषध विषारी ठरते. धर्माचे सध्या तसे झाले आहे. त्याला आपल्यातून काढून टाकणेच योग्य, असे मत व्यक्त करत गीतकार गुलजार यांनी पाकिस्तानामधील मुलांवरील हल्ल्याचा निषेध केला. औरंगाबाद येथे ‘मिर्झा गालिब’ या त्यांच्या पुस्तकाच्या मराठीतील अनुवादित आवृत्तीच्या प्रकाशनासाठी आले होते. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
जन्म घेताना आई-वडील निवडता येत नाहीत. कोणत्या देशात जन्मावे हे कोणाच्या हाती असते ? मग पाकिस्तानामधील त्या चिमुकल्यांवर बंदूक चालविताना त्यांचे हात का थरथरले नाहीत. हे सारे सहन न होणारे आहे, अशा शब्दांत व्यक्त होत सुप्रसिध्द गीतकार गुलजार यांनी धर्मसंस्थेवर  भाष्य केले. धर्म ही व्यवस्था मनशांतीसाठी असते. जगण्यासाठी असते. आता असे प्रकार अस्वस्थ करून जातात, असे सांगत त्यांनी पाकिस्तानातील त्या घटनेचा निषेध व्यक्त केला.

मुलांसाठी गाणी लिहिणारे गुलजार समजून घ्यावेत, अशा स्वरूपाचे प्रश्न त्यांना विचारले जात होते. ‘लकडी की काठी’ हे सुप्रसिध्द गाणे असेल किंवा त्यांनी लिहिलेली बालगीते. नक्की कवी म्हणून काय होते. व्यक्त होताना बालपण कसे अनुभवता असे विचारताच ते म्हणाले, बालसाहित्य विश्वात मल्याळम, मराठी व बांगला भाषेत काही प्रयोग सुरू आहेत. पंजाबी, उर्दू आणि अनेक भाषेमध्ये तशी घडामोड दिसत नाही. अगदी शून्यच म्हणा ना! मुलांना कवितेतून एक भाषिक खेळ द्यावा लागतो. मग ते त्यात रमतात. हे करायचे असेल तर स्वत मूल होणे हाच एकमेव मार्ग असतो. माझ्यात एक मूल अजूनही दडलेले आहेच. खरे तर त्यांच्या विश्वात रमताना वेगळीच गंमत असते, असेही ते म्हणाले. बालसाहित्याच्या क्षेत्रात अजून खूप करता येईल. चकमकसाठी एक प्रयोग केला होता. दोन ओळी लिहायच्या त्यावर मुलांनी चित्र काढायची, अशी संकल्पना राबविली. त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाल्याचे गुलजार यांनी या वेळी सांगितले. बालसाहित्याच्या अनुषंगाने व्यक्त होताना पाकिस्तानच्या त्या हल्ल्याचा उल्लेख झाला. या घटनेनंतर ते एका कवितेतूनही व्यक्त झाले होते. त्याचा संदर्भ देत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना गुलजार यांनी धर्म शब्दावर भाष्य केले. या वेळी ‘मिर्झा गालिब’ या पुस्तकाचे अनुवादक ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र, प्रकाशक अरुण शेवते, सुप्रसिध्द शायर बशर नवाज, न्या. नरेद्र चपळगावकर आदींची कार्यक्रमास उपस्थिती होती.

गुलजारांची लघुकादंबरी लवकरच
 गुलजार यांच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी अशी की, त्यांनी आतापर्यंत कादंबरी प्रकारात लिखाण केले नव्हते. मात्र, थोडय़ा दिवसांत त्यांची लघुकांदबरी प्रकाशित होणार असून त्याचे नाव ‘दो लोग’ असल्याचे त्यांनी सांगितले. ईशान्य भारतातून लिहिल्या जाणाऱ्या कवितांचा दर्जा सकस असल्याचे सांगत गुलजार यांनी मराठीतील दलित कवितांवर जीव जडल्याचेही सांगितले. अरुण कोल्हटकर, दिलीप चित्रे यांच्या आजच्या कविता भावतात, असेही म्हणाले.