प्रीतिसंगमावर हजारो साधू, संत येणार
सिंहस्थ पर्वकाळ उज्जन येथे गंगा नदीकाठी सध्या संपन्न होत असून, कोटय़ावधी भाविक गंगेत स्नान करून पूजाअर्चा करून पुण्य करीत आहेत. त्यानंतर सुरू होणारा अत्यंत भाग्यशाली आणि पुण्यकारी कनयागत पर्वकाळ १२ ऑगस्ट २०१६ श्रावण शुध्द नवमीपासून सुरू होत आहे. या काळात करहाटक-कराडच्या कृष्णा-कोयनेच्या पवित्र प्रीतिसंगमावर पवित्र स्नानासाठी हजारो संत, साधू, भाविक, कृष्णा नदी स्नानाला येणार असून, या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन कराड कन्यागत महोत्सव समिती करणार आहे.
वर्षभर होणाऱ्या या कार्यक्रमासाठी श्री. श्री. रविशंकर, श्री योगगुरू रामदेवबाबा, उज्जनचे अवधेशानंद महाराज, करवीर शंकराचार्य, स्वर्णवल्ली शंकराचार्य यांची विविध कार्यक्रमांना उपस्थिती असणार आहे.
गुरू हा ग्रह प्रत्येक राशीत १३ महिने असतो. तो ज्यावर्षी कन्या राशीत जातो ते कन्यागत पर्व समजले जाते. या पर्वकाळात गंगा नदी कृष्णा नदीला भेटावयास येते व कृष्णा गंगास्वरूप होते.
कराडला धार्मिकदृष्टय़ा अत्यंत महत्त्व प्राप्त आहे. स्कंद पुराण, अग्नी पुराण आदी पुराणांमध्ये कराडच्या स्नानाचे महत्त्व सांगितले आहे. त्यानिमित्त मुख्य समारोहाच्या अनुषंगाने वातावरण निर्मितीकरिता तसेच दशहरा महोत्सवानिमित्त कृष्णानदीची आरती ५ जून २०१६ ते १४ जून २०१६ अखेर रोज सायंकाळी ठीक साडेसहा वाजता आयोजित केली आहे.
ज्येष्ठ शुध्द दशमीला दशहरा असे नाव आहे. या तिथीस भूतलावर भगीरथाने गंगेचे अवतरण केले म्हणून या दिवशी गंगापूजन केले जाते. दशहरा व्रत अत्यंत पवित्र मानले जाते. कृष्णा स्नान, तसेच कृष्णेचा परिसर स्वच्छ ठेवणे, कृष्णेचे पावित्र्य जपणे हे या व्रताचे अंग समजले जाते. म्हणून कन्यागत महोत्सव समितीने दशहरा महोत्सवाचे आयोजन केले आहे. रोज संध्याकाळी ठीक साडेसहा वाजता कृष्णा नदीची आरती आयोजित केली आहे.
आरती झाल्यावर प्रसाद वाटप होणार आहे. या आरतीमध्ये अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या आरतीच्या निमित्ताने नदीच्या स्वच्छतेचा संदेश दिला जाणार आहे.
वर्षभर चालणाऱ्या कन्यागत महोत्सवाला सहकार परिषदेचे अध्यक्ष नामदार शेखर चरेगावकर, सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री विजय शिवतारे, आमदार पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील, आनंदराव पाटील आदींचे, तसेच कराड नगरपरिषदेच्या अध्यक्षा संगीता देसाई, उपाध्यक्ष सुभाष पाटील यांचेही सहकार्य लाभणार आहे. तरी समस्त नागरिकांनी या महोत्सवात सहभागी व्हावे व तन, मन ध्यानाने कन्यागत समितीला पुढे होणाऱ्या सर्व कार्यक्रमांना सहकार्य करावे, असे समितीतर्फे आवाहन करण्यात आले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 9, 2016 12:02 am