News Flash

महाराष्ट्रातील धार्मिक स्थळं दिवाळीनंतर सुरु करणार, मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत

दुसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून आरोग्य सुविधांचे नियोजन करण्याचेही मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
करोना वाढीचा दर तसेच मृत्यू दर कमी होताना दिसत असले तरी गाफील न राहता युरोपप्रमाणे दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी ठेवा. माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेमुळे करोनाचा संसर्ग रोखण्यात काही प्रमाणात यशस्वी झालो असून डिसेंबरमध्येही पुन्हा ही मोहीम परिणामकारकपणे राबविण्याचे नियोजन करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांना दिले. तसेच प्रार्थना स्थळे उघडण्याबाबतचा निर्णय दिवाळीनंतर घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मनसे, भाजपा यांनी महाराष्ट्रातील मंदिरं कधी उघडणार? असा प्रश्न सातत्याने महाराष्ट्र सरकारला विचारला. त्यासाठी आंदोलनंही केली. आता धार्मिक स्थळं दिवाळीनंतर उघडतील असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील करोनाचा संसर्ग नियंत्रित ठेवण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी दूरचित्र संवादाच्या माध्यमातून चर्चा करताना हे आदेश दिले. आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ दीपक म्हैसेकर मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आणि राज्य कृती गटाचे तज्ज्ञ डॉक्टर्स सहभागी झाले होते. मार्चपासून करोना विषाणूवर नियंत्रण मिळविण्यासाठी आपण लढत असून या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यात आपल्याला यश येत असल्याचे दिसत असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले. या विषाणूचा जेव्हा चंचूप्रवेश झाला तेव्हा टाळेबंदी केली आणि आता हळूहळू सर्व खुले करू लागलो आहे. त्यामुळे सुरुवातीला शहरांत असलेला संसर्ग आता राज्यभर सर्वत्र पसरला असला तरी आरोग्यविषयक खबरदारी घेतल्यामुळे उन्हाळा आणि पावसाळ्यात मोसमी आजार आढळले नाहीत.

मात्र आता हिवाळ्यात कोविड व्यतिरिक्त इतर साथीचे आजारही उफाळून येण्याचा धोका असून हृदयविकार, न्युमोनिया, अस्थमा, फ्ल्यू यासारख्या रुग्णांनी अधिक काळजी घेणे आवश्यक असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. सर्व काही खुले केल्याने विशेषत: शासकीय कार्यालयात गर्दी वाढू लागली आहे. ती कमी करणे, त्यासाठी काही कल्पक उपक्रम राबविणे गरजेचे आहे. जनतेच्या खूप जास्त संपर्कात येणारे लोक, बस चालक-वाहक, सार्वजनिक व्यवस्थेतील कर्मचारी हे ‘सुपर स्प्रेडर्स’ असू शकतील. त्यामुळे त्यांच्या चाचण्या लगेच करून घेण्याच्या सूचनाही त्यानी यावेळी केल्या.

प्रार्थना स्थळे उघडण्याचा निर्णय दिवाळीनंतर

प्रार्थना स्थळे उघडण्याच्या बाबतीतही दिवाळीनंतर निर्णय घेण्यात येईल. मंदिरांमध्ये ज्येष्ठ नागरिक नियमितपणे जातात, हा विषाणू ज्येष्ठ आणि सहव्याधी रुग्णांना अधिक धोकादायक असल्याने याबात अधिक काळजी घेऊन निर्णय घ्यावा लागत असल्याचेही त्यांनी सांगितले.
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत सापडलेल्या सहव्याधी नागरिकांच्या संपर्कात राहणे गरजेचे असून त्यांची सातत्याने चौकशी करा. त्यामुळे करोनाची दुसरी लाट आली तरी मोठी आपत्ती टाळू शकू असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, करोना रूग्णांवर उपचारासाठी उभारण्यात आलेल्या रूग्णालय,केंद्रातील सुविधा काढून टाकू नका. उलट आरोग्य सुविधांमधील त्रुटी दूर करा, वैद्यकीय यंत्रणेला प्रशिक्षित करा, विभागवार डॉक्टर्सचा आढावा घ्या, कर्मचारी कमी करू नका. थोडी विश्रांती द्याा पण तात्पुरत्या सुविधा कायमस्वरूपी होतील याकडे लक्ष द्याा अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2020 9:09 pm

Web Title: religious places in maharashtra will start after diwali hints given by the cm uddhav thackeray scj 81
Next Stories
1 योग्य खबरादारी घेऊन दिवाळीनंतर शाळा सुरु कराव्यात-उद्धव ठाकरे
2 अर्णब गोस्वामी यांच्या विरोधातील केस बंद करणाऱ्या पोलिसांविरोधात हायकोर्टात याचिका
3 महाराष्ट्रात दिवसभरात ३ हजार ९५९ नवे करोना रुग्ण, अ‍ॅक्टिव्ह केसेस एक लाखांपेक्षा कमी
Just Now!
X