संदीप आचार्य, लोकसत्ता

रात्री उशीरापर्यंत नितीनच्या घरची मंडळी ठाण्यातील वेगवेगळ्या औषध विक्रेत्यांकडे फिरत होती… प्रत्येक ठिकाणी रेमडेसिवीर नसल्याचे ऐकायला मिळत होते. अशीच काहीशी परिस्थिती राज्यात अनेक ठिकाणी असून वाढत्या करोना रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याचे डॉक्टरांचेही म्हणणे आहे. मात्र, अन्न व औषध प्रशासनाच्या म्हणण्यानुसार राज्यात रेमडेसिवीरचा पुरेसा साठा असून कुठेही कमतरता नाही. राज्यात दररोज जवळपास पन्नास हजार नवीन करोना रुग्ण आढळत असून आगामी काही दिवसात रुग्णालयांत खाटा मिळणे तसेच रुग्णांना ऑक्सिजन मिळण्यात अडचणी निर्माण होतील असे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर करोना रुग्णांना रेमडेसिवीर मिळण्यात आजच अनेक अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागत आहे.

रोज ५० हजार रेमडेसिवीरचा पुरवठा!

मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, लातूर, कोल्हापूर, जळगाव व नांदेड आदी जिल्ह्यात रेमडेसिवीर अभावी रुग्णांचे हाल होत असल्याचे डॉक्टर व नातेवाईकांचे म्हणणे आहे. तर राज्यात कुठेही रेमडेसिवीरची कमतरता नसल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांचा दावा आहे. आयुक्त काळे यांच्या म्हणण्यानुसार “आजच्या दिवशी रेमडेसिवीरच्या १ लाख ३२ हजार २८१ इंजेक्शनचा साठा उपलब्ध असून गेल्या तीन दिवसांत आम्ही रोज ५० हजार रेमडेसिवीरचा पुरवठा राज्याच्या वेगवेगळ्या भागात करत आहोत. राज्यातील रुग्णसंख्येच्या १५ टक्के दाखल रुग्णांना रेमडेसिवीरची आवश्यकता आहे, असे लक्षात घेतले तर १५ ते २० हजार रेमडेसिवीर लागतील. आम्ही रोज ४० ते ५० हजार रेमडेसिवीरचा पुरवठा करत असल्याने तुटवडा असण्याचा प्रश्नच येत नाही”, असे आयुक्तांचे म्हणणे आहे.

रेमडेसिवीरचा फक्त कागदोपत्रीच साठा?

आजच्या दिवशी ठाणे जिल्ह्यात १४ हजार ७९२ रेमडेसिवीर उपलब्ध आहेत, तर मुंबईत १२ हजार २०२, नाशिक विभागात १३ हजार ५५०, अमरावती विभाग २१ हजार ३४१, औरंगाबाद विभाग ४० हजार ७०३, नागपूर विभाग ७ हजार ३०९ तर पुणे विभागात २० हजार ६८५ एवढा रेमडेसिवीरचा साठा उपलब्ध असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. एकूण रुग्णसंख्या व उपलब्ध साठा यांचा विचार करता रेमडेसिवीरचा साठा कागदोपत्री बरोबर दिसत असला तरी प्रत्यक्षात रुग्णांना रेमडेसिवीरसाठी जागोजागी हेलपाटे मारावे लागत आहेत.

रुग्णांच्या तसेच लोकप्रतिनिधींच्या तक्रारी लक्षात घेऊन आयुक्त अभिमन्यू काळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. यात सहा जिल्ह्यांमधील त्रुटी लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन रुग्णालयाशी संलग्न औषध विक्रेते तसेच ठराविक मध्यवर्ती दुकानात रेमडेसिवीरचा साठा ठेवण्याचा निर्णय घ्यावा अशा सूचना दिल्या आहेत.

मुंबईत ३ दिवस पुरतील इतकेच लसीचे डोस शिल्लक! मुंबईच्या महापौरांनी दिली चिंता वाढवणारी माहिती!

रुग्ण, डॉक्टरही म्हणतायत रेमडेसिवीर उपलब्ध नाहीच!

एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार ज्या छोट्या नर्सिंग होम्सना कोविड रुग्णालय म्हणून मान्यता दिल्यानंतर तेथे औषध विक्री दुकान नसल्याने रुग्णांना अन्यत्र रेमडेसिवीर आणण्यासाठी पाठवले जाते. काही दुकानात रेमडेसिवीर मिळाले नाही की, नातेवाईक अस्वस्थ होतात व रेमडेसिवीर उपलब्ध नसल्याची तक्रार सुरु होते. एफडीए अधिकाऱ्यांचा हा दावा चुकीचा असल्याचे जागोजागीच्या रुग्णांचे तसेच डॉक्टरांचे म्हणणे आहे. रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्यानेच ते उपलब्ध होण्यात अडचणी येत असून हे एफडीएचे अपयश आहे.

बाजारात आज सिप्ला, हेटेरो हेल्थकेअर, मायलॉन, झायडस कॅडिला, डॉ रेडिज, ज्युबीलेट लाईफ सायंसेस आणि सनफर्मा अशा सात कंपन्या रेमडेसिवीर तयार करतात. रुग्ण वाढू लागताच एफडीए आयुक्त अभिमन्यू काळे यांनी सर्व कंपन्यांची व प्रमुख औषध विक्रेत्यांची बैठक घेऊन कंपनी ज्या दराने विक्रेत्यांना रेमडेसिवीर देते त्यावर दहा ते पंधरा टक्के नफा घेऊन रुग्णांना रेमडेसिवीर उपलब्ध करून देण्याची विनंती केली. मात्र बहुतेक रुग्णालयांशी सलग्न असलेल्या औषध विक्री दुकानदार तसेच मध्यवर्ती पुरवठादार यांनी छापील किंमतीनुसार रेमडेसिवीर विक्री करण्याचा निर्णय घेतला. यात रुग्णालय व विक्रेत्यांना प्रचंड नफा मिळत असल्याने रुग्ण खाजगी रुग्णालयात दाखल होताच त्याला रेमडेसिवीर देण्यात येत असल्याचे काही डॉक्टर व अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

तुडवड्यामागे काळा बाजारच?

शासकीय रुग्णालयात रुग्णांना देण्यात येणाऱ्या रेमडेसिवीरचे प्रमाण व खाजगी रुग्णालयातील प्रमाण यात तफावत दिसेल असेही एफडीएच्या सूत्रांनी सांगितले आहे. परिणामी रेमडेसिवीरचा वापर वाढत चालला असला तरी रेमडेसिवीरचा साठा राज्यात पुरेशा प्रमाणात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. छाटी रुग्णालयातील रुग्णांना रेमडेसिवीर मिळण्यात येणाऱ्या अडचणी तसेच सर्व औषध दुकानात रेमडेसिवीर विक्रीला परवानगी यातून रेमडेसिवीर मिळत नसल्याची ओरड होते असे एफडीएच्या सूत्रांचे म्हणणे आहे. तर मुंबई, ठाणे, पुणे नाशिक आदी ठिकाणी रुग्णांचे रेमडेसिवीर अभावी जे हाल होत आहेत त्यामागे काळाबाजार व इंजेक्शन पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसणे हेच कारण असल्याचे डॉक्टर व रुग्णांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.