रेमडेसिवीरचा साठा केल्याप्रकरणी पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना शनिवारी ताब्यात घेतलं होतं. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे रविवारी राज्यात राजकारणा पडसाद उमटले. राज्य सरकार आणि भाजपा नेते आमने-सामने आले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीकाही केली. त्यानंतर आता भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

करोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिवीरचा साठा करून ठेवल्याबद्दल ब्रुक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना पोलिसांनी शनिवारी (१७ एप्रिल) ताब्यात घेतलं होतं. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्ध्या रात्री पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना सुनावलं. त्यानंतर डोकानिया यांना पोलिसांनी सोडून दिलं. मात्र, रविवारी यावरून राजकीय घमासान बघायला मिळालं. फडणवीस यांच्याबरोबर आमदार प्रसाद लाड यांनीही ठाकरे सरकारवर टीकास्त्र डांगत इशारा दिला.

“या तिघाडी सरकारने सर्व सीमा ओलांडल्या आहेत. स्वतः काही करायचे नाही. भाजपा जनतेचा पक्ष म्हणून ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन महाराष्ट्रातील जनतेसाठी आणणार, याचा राग म्हणून की काय राजकीय आकसाने आज हे कृत्य करून तुम्ही चुकलात.. याची किंमत मोजावी लागणार!,” असं लाड यांनी म्हटलं आहे.

या प्रकरणावर फडणवीस काय म्हणाले?

“महाराष्ट्राला रेमडेसिवीर मिळाव्यात या प्रामाणिक हेतूनं आम्ही सारे प्रयत्न करीत असताना अचानक ब्रुक फार्माच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेण्याचा महाराष्ट्र सरकारनं केलेला प्रकार अतिशय दुर्दैवी, गंभीर आणि चिंताजनक आहे. एका मंत्र्यांचा ओएसडी दुपारी फोन करून धमकी देतो आणि विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून तुम्ही रेमडेसिवीर देऊच कसे शकता, असा जाब विचारतो आणि संध्याकाळी १० पोलीस त्यांना ताब्यात घेतात. हे सारेच अनाकलनीय आहे. आज पोलीस ठाणे आणि उपायुक्त कार्यालयात जाऊन याचा जाब विचारला. महाराष्ट्र आणि दमणच्या परवानग्या घेतल्या असताना, अधिकाधिक रेमडेसिवीर महाराष्ट्राला द्या, असं स्वतः केंद्रीय मंत्र्यांनी या कंपनीला सांगितलं असताना, इतक्या गलिच्छ पातळीवर राजकारण होत असेल, तर हे फारच गंभीर आहे. झालेली घटना योग्य नाही आणि ती कायद्यानुसार नाही, एवढेच म्हणेन,” अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली आहे.