राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असून, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी यासंदर्भात मोदी सरकारवर खळबळजनक आरोप केला आहे. राज्य सरकारने १६ कंपन्यांना रेमडेसिवीरच्या पुरवठ्याबद्दल विचारणा केली. त्यावर महाराष्ट्राला औषधी न देण्याचं केंद्राकडून सांगण्यात आल्याचं कंपन्यांचं म्हणणं आहे, असं मलिक म्हणाले. मलिक यांनी केलेल्या धक्कादायक आरोपानंतर भाजपाने पलटवार केला आहे.

भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपावर प्रत्युत्तर दिलं असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढे येऊन भूमिका मांडावी, असंही म्हटलं आहे. “अशा प्रकराचे निराधार आरोप करण्याऐवजी नवाब मलिक यांनी पुरावा द्यावा अन्यथा माफी मागावी. परिस्थिती बिकट असून, महाविकास आघाडी सरकारने दोषारोपाचे खेळ थांबवावेत आणि करोना परिस्थिती हाताळावी. ही जर राज्य सरकारची अधिकृत भूमिका असेल, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः पुढे यावं आणि वस्तुस्थिती स्पष्ट करावी. नाहीतर अशा प्रकारचे निराधार आणि बेजबाबदार आरोप करण्यापासून आपल्या मंत्र्यांना थांबवावं,” असं भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

नवाब मलिक काय म्हणालेत?

“हे अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक आहे. महाराराष्ट्र सरकारने जेव्हा १६ कंपन्यांना रेमडेसिवीरची निर्यात करायला सांगितलं, तेव्हा ‘आम्हाला केंद्र सरकारने महाराष्ट्राला औषधी पुरवू नका असं सांगितलं आहे,’ अशी माहिती कंपन्यांनी दिली आहे. जर औषधांचा पुरवठा केला नाही, तर परवाने रद्द करू असा इशारा आता या कंपन्यांना देण्यात आलेला आहे. हा धोकादायक पायंडा असून, या परिस्थितीत औषधांचा साठा जप्त करून गरजूंना पुरवण्याशिवाय महाराष्ट्र सरकारकडे कोणताही पर्याय नाही,” असं मलिक यांनी म्हटलेलं आहे.