अभ्यास समितीचा अहवाल सादर; महापालिकेकडून अंमलबजावणी सुरू

वसईतील पूरस्थितीचा अभ्यास करून भविष्यातील पुराचे संकट टाळण्यासाठी नेमण्यात आलेल्या सत्यशोधन समितीचा पहिला अहवाल महापालिकेला सादर झाला असून त्यानुसार पालिकेने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

७ जुलै ते १० जुलै या कालावधीत वसईत झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरात पूर आला आणि जनजीवन विस्कळीत झाले होते. पुरामुळे वीजपुरवठा खंडित झाला, ट्रेन बंद पडल्या, तसेच शहरातील अनेक भागांत पाणी जाऊन कोटय़वधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. ही पूरपरिस्थिती का निर्माण झाली आणि भविष्यात पूरस्थितीवर मात करण्यासाठी काय उपाययोजना करता येईल यासाठी सोमवारी महापालिकेने सत्यशोधन समिती स्थापन केली होती. त्यात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संसोधन संस्था (निरी), भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) पर्यावरण विज्ञान आणि अभियांत्रिकी केंद्र (सीईएसई), पर्यावरण संशोधन आणि शिक्षण केंद्र (सीईआरई) आदींचा समावेश आहे. ४ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर या कालावधीत या समितीने विविध प्रभाग समितीत हजर राहून जनसुनावणी घेतली होती. समितीचा पहिला अहवाल महापालिकेला सादर करण्यात आला आहे. त्यानुसार पालिकेने उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याची आढावा बैठक शुक्रवारी झाली.

ही समिती नऊ महिने शहराचा अभ्यास करत असून त्वरित करायच्या उपाययोजना आणि दीर्घकालीन उपाययोजनांचा अहवाल सादर करणार आहे. पहिल्या अहवालानुसार अंमलबजावणी सुरू केली असून नालेसफाई करण्यात आलेली आहे. ती मेमध्ये पूर्ण होईल, असे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. या अभ्यास समितीच्या कामासाठी पालिकेने १२ कोटी रुपये खर्च केले.

समितीने केलेल्या शिफारशी

* नाल्यांचे रुंदीकरण आणि खोलीकरण करणे

*  रेल्वेचे कल्वर्ट (मोऱ्या) सक्शन पंपाने साफ करणे

*  खारभूमी बंधाऱ्यावर कल्वर्ट बांधणे

*  नालासोपारा येथे २ आणि वसईत १ असे तीन अतिरिक्त कल्वर्ट बांधणे

*  नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमण काढणे

*  रेल्वेमार्गाला समांतर नाल्याचे रुंदीकरण करणे

पालिकेकडून रेल्वेला २४ कोटी

समितीने दिलेल्या शिफारशीनंतर महापालिकेने त्वरित अंमलबजावणी सुरू केली आहे. चिखलडोंगरी आणि आगाशी येथील खारभूमीवर बंधारे बांधण्यासाठी १ कोटी ३४ लाख रुपयांची तरतूद करून निविदा काढल्या आहेत, तसेच नालासोपारा आणि वसई येथे अतिरिक्त तीन कल्वर्ट बांधण्यासाठी रेल्वेला २४ कोटी रुपये पालिकेने अदा केले आहेत.

आज झालेल्या बैठकीत सत्यशोधन समितीच्या अहवालाचे वाचन झाले. या बैठकीत समितीने शिफारस केलेल्या कामांचे नियोजन ठरवण्यात आले. जी कामे सुरू आहेत, त्यांचा आढावा घेण्यात आला. चांगल्या नियोजनामुळे वसई-विरारकरांना भविष्यात मोठा फायदा होणार आहे

– राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता, वसई-विरार महापालिका

समितीने अहवाल सादर केला आहे. त्यानुसार त्यांनी सुचवलेल्या शिफारशींची अंमलबजावणी केली जाणार आहे.

– बी. जी. पवार, आयुक्त, वसई-विरार महापालिका