महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर शनिवारी झालेल्या ‘शाईहल्ल्या’चा निषेध करण्यासाठी शहर जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून वाडिया पार्कमधील महात्मा गांधीच्या पुतळ्याजवळ धरणे धरले. पंतप्रधानांच्या सभेत काँग्रेस पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना बोलू दिले जात नसल्याचाही यावेळी निषेध करण्यात आला.
यावेळी बोलताना शहर जिल्हाध्यक्ष ब्रिजलाल सारडा म्हणाले की, काँग्रेस कार्यकर्ते गांधीवादी विचारांचे असल्याने अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्यांना आम्ही शांततेच्या मार्गानेच उत्तर देऊ. मंत्री हसन मुश्रीफ, हर्षवर्धन पाटील व आता थोरात यांच्यावर झालेला हल्ला तसेच मुख्यमंत्र्यांना सभेत न बोलू देणे म्हणजे विरोधकांची वैचारिक पातळी घसरल्याचेच व ही कृत्ये जाणीवपूर्वक होत असल्याचे दाखवतात. या घटना वाढत असल्या तरी आम्ही शांततेच्याच मार्गाने त्याचा मुकाबला करु.
सरचिटणीस उबेद शेख यांनी प्रास्ताविक केले. सरचिटणीस अनंत देसाई, डॉ. अविनाश मोरे, सविता मोरे, बाळासाहेब भुजबळ, निखिळ वारे, बाळासाहेब पवार, नलिनी गायकवाड, साहेब जहागीरदार, रॉबिन साळवे, धनंजय जाधव, स्वप्नील दराडे, अजय औसरकर आदी सहभागी झाले होते.
छाया ओळी-
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर झालेल्या शाईहल्ल्याचा निषेध करण्यासाठी नगर शहरातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी रविवारी काळ्या फिती लावून महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ मौन धारण करुन धरणे धरले. (छाया-अनिल शाह, नगर)