पुण्याच्या भूमीतून लोकमान्यांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे,’ हा नारा दिला. स्वातंत्र्य मिळाले पण, सुराज्य मिळाले नाही. काँग्रेसच्या परिवारवादी सरकारने सामान्य माणसांच्या आकांक्षांची पूर्ती केली नाही. केवळ मतपेटीचे राजकारण केले. तुकडे फेकून मते घ्यायची आणि पाच वर्षे ऐशोआरामाचे जीवन उपभोगायचे यामुळे देशाची प्रगती झाली नाही. सुराज्यासाठी काँग्रेसला हटवा, असे आवाहन भाजपचे प्रचारप्रमुख आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.
भाजप शहरातर्फे आयोजित निर्धार सभेत नरेंद्र मोदी यांनी मुद्दय़ांच्या आधारे काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. शहराध्यक्ष अनिल शिरोळे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, लोकसभेचे उपनेते गोपीनाथ मुंडे, खासदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते प्रकाश जावडेकर, राष्ट्रीय चिटणीस श्याम जाजू, पूनम महाजन, आमदार गिरीश बापट, माधुरी मिसाळ, पंकजा मुंडे-पालवे, भीमराव तापकीर या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते. चांदीची तलवार, पुणेरी पगडी, उपरणे प्रदान करून नरेंद्र मोदी यांचा सत्कार करण्यात आला.
स्वातंत्र्याच्या वेळी एक रुपया आणि एक डॉलर यांची किंमत सारखीच होती. आता रुपयाची किंमत घटली असून लवकरच ती केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या वयाइतकी होईल. हे देखील एक अर्थशास्त्रज्ञ पंतप्रधानपदावर असताना घडत आहे. दिल्लीतील नेते पैसे खाण्यामध्ये आणि लुटण्यामध्ये बुडलेले असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.
काँग्रेसमुक्त भारताची निर्मिती होत नाही, तोपर्यंत समस्या आणि संकटांपासून मुक्ती मिळणार नाही, असे मोदी म्हणाले.
 देशातील जनतेने विचार खूप ऐकले आहेत. आता कृतीची आवश्यकता आहे. १०० दिवसांत महागाई हटविण्याचे आश्वासन देणारे काँग्रेस महागाई कमी करू शकत नाही. सडून जाण्याऐवजी धान्याचे गरिबांना वाटप करावे असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असतानाही दारूनिर्मिती करणाऱ्यांना ६५ पैसे दराने हे सडके धान्य विकले. याला जबाबदार कोण याचा जबाब जनता मागत आहे.
अटलजींचे सहा वर्षांचे ‘एनडीए’ सरकार आणि ‘यूपीए’ची नऊ वर्षे यामध्ये कोण सरस हे काही वेगळे सांगायला नको. केवळ मतपेढीच्या भरवशावर राजकारण चालत नाही. देशाच्या भवितव्याची चिंता आणि सामान्य माणसाच्या सुरक्षेचा विचार करून काँग्रेसला हद्दपार करा, असे आवाहन त्यांनी केले.
गुजरातेतून महाराष्ट्राला मोफत वीज
गुजरात महाराष्ट्राला वीज देणार होते. पण, राज्यातील सरकारचे दिल्लीमध्ये काही चालत नाही. सरदार सरोवराची उंची वाढविली, तर वीज अधिक निर्माण होऊ शकते आणि महाराष्ट्राला ४०० कोटी रुपयांची वीज मोफत मिळू शकते. त्याला परवानगी देण्यासाठी बैठक करता आलेली नाही. मलईची गॅरेंटी नसेल तर काम पुढे सरकत नाही. अशा सरकारला दूर करून परिवर्तनाच्या यात्रेत महाराष्ट्र मागे राहणार नाही हा विश्वास आहे, असेही मोदी म्हणाले. ‘छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार’ असे मराठीमध्ये उच्चारून त्यांनी लोकांनाजिंकले.