नाशिक म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येते रामाचे मंदिर, गोदाघाट आणि अशीच धार्मिक स्थळे. इथे दर १२ वर्षांनी भरणाऱ्या कुंभमेळ्यामुळे या शहराला विशेष धार्मिक महत्त्व आहे. मात्र पुण्यभूमी असा लौकिक असलेल्या नाशिक महापालिकेत मात्र देवदेवतांना  नो एंट्री करण्यात आली आहे. नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काढलेल्या नव्या आदेशामुळे ही देवबंदी लागू करण्यात आली आहे. नाशिक महापालिकेचा कारभार हाती घेताच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी देव-देवतांचे फोटो महापालिकेतून हटवण्याचे आदेश दिले आहेत.

तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या आदेशानुसार विविध दालनांमध्ये, कक्षांमध्ये, कर्मचाऱ्याच्या टेबलवर असलेले देवदेवतांचे फोटो काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाचे पालन करत तातडीने कर्मचाऱ्यांनी देवदेवतांचे फोटो हटवण्यास सुरुवात केली आहे. तसेच प्रसारमाध्यमांशी बोलण्यासही नकार दिला आहे. एवढेच नाही तर नाशिक महापालिकेत स्वच्छता असलीच पाहिजे असेही त्यांनी बजावले आहे. ‘एबीपी माझा’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी नाशिक महापालिकेत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. देवांचे फोटो काढण्यामागे विचारांची स्वच्छता होणे हा उद्देश असल्याचे स्पष्टीकरण तुकाराम मुंढे यांनी दिले आहे. मात्र तुकाराम मुंढे देवबंदीच्या निर्णयामुळे काय साधणार याची चर्चा सध्या नाशिक महापालिकेत सुरु झाली आहे.