मुद्रणालय महामंडळास कोणीच प्रतिस्पर्धी नसल्याने देशाचे चलन, महत्वाची कागदपत्रे, छपाईची कामे या मुद्रणालयात होत असून त्यांची सुरक्षितता व गोपनीयता पाळणे हे प्रत्येक कामगाराचे कर्तव्य आहे. महामंडळाने अधिकाधिक काम मिळवून नफा वाढविण्याच्या दृष्टीने एका सेलची स्थापना केल्यास आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताचे नाव झळकेल. सध्या नाशिकरोडचे चलार्थपत्र मुद्रणालय आणि देवास येथील मुद्रणालयांचे नोटा छपाईच्या नवीन यंत्रसामग्रीसाठी प्रत्येकी २०० कोटी याप्रमाणे ४०० कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिकरण केले जाणार आहे, अशी घोषणा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री नमो नारायण मीना यांनी केली.
मुद्रणालय महामंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त नाशिकरोड येथील युएस जिमखाना येथे झालेल्या कार्यक्रमात नाशिकरोडच्या चलार्थपत्र मुद्रणालयाला उत्कृष्ट कामकाजाबद्दल महामंडळाचा मुख्य ‘सीएमडी चषक’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी मीना बोलत होते. मुद्रणालयाचे महामंडळात रुपांतर झाल्यानंतर महामंडळ संपूर्ण कर्ज फेडून वर्षांकाठी केंद्राला १०० कोटी रुपये मिळवून देत आहे. महामंडळाच्या स्थापनेनंतर मुद्रणालयाने खर्चात कपात करून उत्पादन वाढ व दर्जेदारपणावर भर दिल्याने केंद्राने स्थापन केलेल्या वेगवेगळ्या महामंडळात मुद्रणालय महामंडळाचा प्रथम क्रमांक लागतो, असेही मीना यांनी नमूद केले. स्पर्धेत आपले स्थान कायम ठेवण्यासाठी महामंडळाने देशातील विद्यापीठे, उत्पादन शुल्क, प्राप्तीकर, विक्रीकर, आदी विभागातील महत्वाची छपाईची कामेही मिळवावीत. स्पर्धेची भावना मनात असेल तरच तुम्ही यशस्वी होऊ शकतात. त्यासाठी दर्जेदार छपाई, त्याची सुरक्षितता व उत्पादनावरील खर्च कमी या त्रिसूत्रीचे योग्य नियोजन केल्यास नफ्यात वाढ होऊ शकते. कामगारांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी स्वत जातीने लक्ष देण्यासह कारखान्याचे विस्तारीकरण, आधुनिकीकरण व नवीन केंद्र सुरू करण्याबाबत लवकरच अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करणार असल्याचे मीना यांनी सांगितले. यावेळी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एम. एस. राणा, खा. समीर भुजबळ, संचालक डॉ. मनोरंजन दास, केंद्रीय अर्थखात्याचे अधिकारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेत तसेच मुद्रणालयातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कामगार व पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. नवीन यंत्रसाम्रगीचे मीना यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. परम भंडारी यांनी सूत्रसंचालन केले. महाप्रबंधक के. के. प्रसाद यांनी आभार मानले.