नीरज राऊत

पावसाळ्यातील विद्युत उपकरणांची डागडुजी रखडण्याची चिन्हे

महावितरणने यंत्रातील बिघाड (ब्रेक डाऊन) विद्युत सामग्री दुरुस्ती आणि डागडुजीसाठी तीन वर्षांच्या कंत्राटाच्या निविदा प्रसिद्ध केल्या, मात्र याकामी कोणताही कंत्राटदार पुढे येत नसल्याने महावितरण कंपनीसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. यामुळे वीजपुरवठा यंत्रणेची पावसाळ्यात राखली जाणारी निगा अधिकच कठीण होऊन बसण्याची चिन्हे आहेत.

महावितरण कंपनीने बंद पडणाऱ्या उपकरणांच्या दुरुस्तीसाठी बिघाड (ब्रेक डाऊन) तसेच सर्व विद्युत उपकरणांच्या डागडुजीसाठी तीन वर्षांचा ठेका राज्यभरात देण्याचे निश्चित केले आहे. त्या दृष्टीने प्रत्येक मंडळनिहाय निविदा काढण्यात येत आहे. याअंतर्गत उपकेंद्र, उच्च व कमी दाब विद्युत सामग्री, तसेच रोहित्र या क्षेत्रातील कामांचा समावेश आहे.

या कामांसाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या निविदांची वेळ काही मर्यादा वाढविण्यातही आल्याचे दिसून आले आहे. असे असताना या ‘ऑपरेशन अ‍ॅण्ड मेंटेनन्स’च्या या कामासाठी कोणताही ठेकेदार पालघर आणि वसई परिमंडळासाठी पुढे येत नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

या कामांसाठी महावितरण कंपनीने निश्चित केलेला दर कमी असल्याचे सांगत विद्युत क्षेत्रातील ठेकेदारांनी या निविदा न भरण्याचे ठरविल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. यासंदर्भात अधीक्षक अभियंता (मुख्यालय) यांनी वसई येथे सर्व संबंधित ठेकेदारांची बैठक घेऊन या सर्व कामांसाठी दरवाढ करण्याचे आश्वासन दिले. मात्र ठेकेदारांच्या असोसिएशन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून हिरवा कंदील दाखवला जात नाही तोवर कोणत्याही ठेकेदारांनी अद्याप निविदा भरल्या नसल्याची माहिती महावितरणच्या उच्चपदस्थांकडून उपलब्ध झाली आहे.

राज्यभरात काही मोजके जिल्हे वगळता सर्वत्र अशाच प्रकारची परिस्थिती असून ठेकेदारांचे मन वळवण्यासाठी तसेच त्यांनी या निविदा भरण्यास तयार व्हावं यासाठी महावितरणचे अधिकारी सध्या प्रयत्नशील आहेत.

पालघर महावितरण मंडळ क्षेत्रात वसई व वाडा तालुके वगळता उर्वरित सहा तालुक्यांमध्ये सुमारे तीन लाख विद्युत ग्राहक आहेत. या सर्व ग्राहकांना मिळणाऱ्या वीज बिलांची देयके यांचे मीटर रीिडग घेऊन त्यांना देयके पोहोचवण्यापर्यंतचे काम सध्या कार्यालयीन (तालुका ) स्तरावर कंत्राटी पद्धतीने केले जात आहे. यात मीटर रीडिंग घेणे आणि बिल ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मंडळ पातळीवर एकत्रित ठेका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठीही निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या निवेदनात देखील प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले असून या सर्व घडामोडींमुळे महावितरणासमोर नव्याने पेच निर्माण झाला आहे.याचप्रमाणे बिघडलेल्या रोहित्र ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीची स्वतंत्र निविदा जाहीर करण्यात आली असून या क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षित तरुणांना किंवा या क्षेत्रात अनुभव असलेल्या मंडळींना नव्याने संधी उपलब्ध होत आहे. हे कंत्राट मंडळ स्तरावर असून सध्या रोहित्र दुरुस्तीची कामे दूरवरील जिल्ह्यात वा लगतच्या राज्यांमध्ये केली जात आहेत. या ठिकाणांसाठी स्थानिक पातळीवर ठेकेदार उपलब्ध झाल्यास त्याचा लाभ जिल्ह्यातील ग्राहकांना होऊ  शकेल.

ठेकेदारांची माघार

सर्व काम मंडळ स्तरावर एकत्रित करून तीन वर्ष कालावधीसाठी दिले जात असल्याने ठेकेदार या निविदांमध्ये रस घेत नसल्याचे सांगण्यात येते. याबाबत निर्माण झालेली कोंडी येत्या काही दिवसांत सुटली नाही तर त्याचा फटका जिल्ह्य़ातील ग्राहकांना बसण्याची शक्यता आहे.