|| सतीश कामत/राजगोपाल मयेकर

रत्नागिरी : वर्षभरापूर्वी आलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी-रहिवाशांना वाटप पूर्ण झाले. उलट सरकारकडून आलेला निधी अखर्चीक राहिल्याने शासनाकडे पुन्हा पाठवावा लागला. शाळांच्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी पुरेसा निधी उपलब्ध न झाल्याने दुरुस्तीचे कामे मात्र रखडली आहेत.

nashik water crisis marathi news,
नाशिक जिल्ह्यात तहानलेल्या गावांच्या संख्येत वाढ, आठवडाभरात ५७ गावे-वाड्यांची भर; धरणसाठा २८ टक्क्यांवर
buldhana bull died due to thunderstorm
बुलढाणा: खामगाव तालुक्याला ‘अवकाळी’ तडाखा; वीज कोसळून बैल ठार, शाळा-घरांवरील टीनपत्रे उडाली
Naxalites killed
बालाघाट जिल्ह्यात पोलीस – नक्षल चकमकीत दोन नक्षलवादी ठार
Unseasonal rains in Washim district
वाशीम जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

वादळाचा फटका बसलेल्यांना अजून सरकारी मदत मिळाली नाही, असा आरोप के ला जातो. सरकारी यंत्रणांनी या आरोपात तथ्य नसल्याचे स्पष्ट के ले. भरपाई मिळाली नसल्याची तक्रार पोकळच असल्याचे उपलब्ध आकडेवारी आणि प्रत्यक्ष पाहणीमध्ये आढळून आले आहे. राजकीय हेतूने उठवलेल्या या आवईमध्ये फारसे तथ्य नाहीच, उलट आलेल्या निधीपैकी सुमारे ५० कोटी रुपये शिल्लक राहिल्याने परत पाठवण्यात आले आहेत.

या वादळाचा मुख्य तडाखा रत्नागिरी जिल्ह्यात दापोली आणि मंडणगड या दोन तालुक्यांना बसला. नारळ-सुपारीच्या बागा, मच्छीमारीचे साहित्य, पाळीव जनावरे, घरांसह अन्य स्थावर मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. वादळ शमल्यानंतर या सर्व प्रकारच्या नुकसानीचे पंचनामे करून निकषांनुसार गेल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात वाटप सुरू झाले आणि ही प्रक्रिया अगदी अलीकडे गेल्या एप्रिल महिन्यात जवळजवळ पूर्ण झाली.

संपूर्ण जिल्ह्यासाठी मिळून एकूण सुमारे २०२ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. त्यापैकी प्रत्यक्षात १५२ कोटी ४८ लाख रुपयांची भरपाई वाटली गेली. त्यामध्ये मुख्य हिस्सा स्वाभाविकपणे दापोली-मंडणगड तालुक्यांचा होता. या दोन तालुक्यांमध्ये मिळून सुमारे ११८ कोटी रुपये वाटण्यात आले. त्यापैकी दापोली तालुक्यात ५७.६० कोटी, तर मंडणगड तालुक्यात ६१ कोटी रुपये भरपाईपोटी देण्यात आले.

नुकसानभरपाईपोटी जिल्ह्यात वितरित झालेल्या एकूण सुमारे १५२ कोटी रुपयांपैकी मुख्य वाटा घरांची पुनर्बांधणी, दुरुस्ती, कपडे, भांडी, धान्य इत्यादींसाठी (११७ कोटी) असून त्या खालोखाल शेती-बागायतीच्या नुकसानीबद्दल भरपाई (३१ कोटी) दिली आहे. मच्छीमारांच्या होड्या व इतर साहित्य, मृत जनावरे, दुकाने व टपऱ्या इत्यादीसाठीही निकषांनुसार मदतीचे वाटप पूर्ण झाले आहे.

हा सर्व निधी टप्प्याटप्प्याने आल्यामुळे गेल्या एप्रिल महिन्यापर्यंत वाटप होत राहिले. तेसुद्धा एकूण निधीपैकी सुमारे २० कोटी रुपयांचा शेवटचा हप्ता मार्चमध्ये मिळाला आहे. त्यानंतर एका महिन्यात लाभार्थ्यांच्या खात्यावर रकमा जमा करण्यात आल्याचे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे.

शाळा दुरुस्तीसाठी तुटपुंजा निधी

जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाड्या अशा सार्वजनिक मालमत्तांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी त्या निधीअभावी दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. शाळांचे एकूण नुकसान सुमारे ८ कोटी रुपयांचे असले तरी त्यापैकी आत्तापर्यंत फक्त एक कोटी रुपये आले आहेत.

नुकसानभरपाईपोटी मागितलेला संपूर्ण निधी शासनाकडून प्राप्त होऊन त्याचे वाटपही झाले आहे. काही लाभार्थ्यांनी नावे, सहहिस्सेदार, बँक खाते इत्यादीबाबतचा तपशील चुकीचा दिल्यामुळे त्यांना मदत वितरित झालेली नाही. पण तीही रक्कम जेमतेम २५-३० लाख रुपये बाकी आहे. उलट, काही अधिशीर्षांखाली मागणीपेक्षा जास्त रक्कम आल्याने परत पाठवली आहे.   – शरद पवार, प्रांताधिकारी

भरपाईसाठीचा २० कोटी रुपयांच्या निधीचा शेवटचा हप्ता मार्चमध्ये प्राप्त झाल्यानंतर त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात आलेली आहे. त्यानंतर एप्रिल महिन्यात थकीत भरपाईसंबंधित लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे. खाते क्रमांकात काही त्रुटी राहिल्या असतील, त्यांच्या खात्यावर रकमा वळत्या न झाल्यास त्यांची यादी बँकेकडून मिळविणे आणि त्यात लाभार्थ्यांच्या बँक खात्याची योग्य माहिती टाकून भरपाई देणे ही प्रक्रिया सुरू आहे. – वैशाली पाटील, तहसीलदार, दापोली

हर्णे गावात फेरपंचनामे करण्यात आले आहेत. जवळपास सर्वांना भरपाई मिळालेली आहे. ज्यांच्या अजूनही तक्रारी असतील, त्यांचे योग्य पंचनामे झालेत की नाही याचा तपशील तपासावा लागेल. पण एकूणच निसर्ग भरपाई प्रकरणात महसूल विभागाने ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्याला आतापर्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला असून थकीत भरपाई मिळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. – महेश पवार, उपसरपंच, हर्णे

आंजर्ले गावातील यापूर्वी लोकांना भरपाई मिळालेली नसल्याच्या तक्रारी ग्रामपंचायतीत येत होत्या. आम्ही याबाबत लगेच तहसील कार्यालयात नाव आणि अकाउंट नंबरसह माहिती कळवत होतो. त्याबाबत तहसील कार्यालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला असून त्यांच्या खात्यावर भरपाई पाठविण्याच्या प्रक्रिया सुरू झालेली आहे. – मंगेश महाडिक, उपसरपंच, आंजर्ले