News Flash

पुणे-सातारा महामार्गाची दुरुस्ती करा अन्यथा, १ डिसेंबरपासून टोलबंदी

उदयनराजे यांचा इशारा

(संग्रहित छायाचित्र)

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पुणे ते सातारा रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. रिलायन्स आणि राष्ट्रीय महामार्ग प्रााधिकरणाने नोव्हेंबरअखेर रस्त्यांची आवश्यक ती सर्व डागडुजी करावी. अन्यथा, १ डिसेंबरपासून सातारा-पुणे रस्त्यावरील दोन्ही टोल नाक्यांवरील टोल वसुली करू दिली जाणार नसल्याचा निर्वाणीचा इशारा माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी महामार्ग प्राधिकारी व रिलायन्स कंपनीला दिला.

पुणे-कोल्हापूर सहापदरीकरणाचे काम गेली अनेक वर्षे संथगतीने सुरू आहे. अर्धवट रस्ता, रखडलेली कामे, खड्डय़ांचे साम्राज्य आणि हे सारे असताना द्यावा लागणारा टोलचा भरूदड या साऱ्यांमुळे सध्या या मार्गावरून जाताना  प्रवासी जनतेला प्रचंड शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. याविरोधात सह्य़ांची मोहीम सुरू करण्यात आलेली असून याद्वारे रस्त्यावरील संघर्षांसह न्यायालयात याचिका दाखल करण्याच्याही हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर या रेंगाळलेल्या कामाबाबत संबंधित बांधकाम कंपनी आणि प्रााधिकरण यांना उदयनराजे यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे.

उदयनराजे म्हणाले, की या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवासी जनतेला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. शारीरिक आणि आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे नागरिकांमधून होत असलेला उठाव योग्य व समर्थनीय आहे. यामुळे टोल घेताना चांगला रस्ता देणे ही ज्यांची जबाबदारी आहे, त्यांनी तो तातडीने दुरूस्त करावा अन्यथा १ डिसेंबरपासून सातारा-पुणे रस्त्यावरील दोन्ही टोल नाक्यांवरील टोल वसुली करू दिली जाणार नाही. उदयनराजे भोसले यांनी याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संबंधित अधिकारी आणि रिलायन्सचे अधिकारी यांना बोलावून या रस्त्याच्या समस्येबाबत जनतेच्या भावना स्पष्ट केल्या.

पुणे-कोल्हापूर सहापदरीकरणाचे काम गेली अनेक वर्षे संथगतीने सुरू आहे हा रस्ता ठिकठिकाणी उखडला गेला आहे. काही ठिकाणी उड्डाणपुलाची कामे अजूनही चालू असल्याने पर्यायी उपलब्ध केलेला वळण रस्ता हा प्रचंड खराब आहे. महामार्गावर काही ठिकाणी विचित्र प्रकारचे उंचवटे आणि खोलगटपणा असल्याने वाहनधारकांना ते समजत नसल्यामुळे मोठे अपघात घडत आहेत.

या महामार्गावरील रस्त्यांची दुरूस्ती आणि डागडुजी ३० नोव्हेंबपर्यंत करावी. ती न केली गेल्यास, येत्या  १ डिसेंबरपासून जनतेला बरोबर घेऊन, सातारा पुणे रस्त्यावरील दोन्ही टोल नाक्यावरील टोल वसुली करू दिली जाणार नाही, असा सक्त इशारा उदयनराजे भोसले यांनी संबंधितांना दिला आहे.

काम लवकरच पूर्णत्वाकडे – नितीन गडकरी

पुणे : पुणे-सातारा महामार्गाच्या कामात अनेक अडचणी येत आहेत. स्थानिक ठेकेदार आणि नागरिकांकडूनही अडचणी निर्माण केल्या जात आहेत. या रस्त्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम लवकरच पूर्ण करू, अशी ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. गडकरी म्हणाले, की पुणे-सातारा महामार्गात अनेक अडचणी येत आहेत. स्थानिक ठेकेदार, नागरिक कामात अडचणी आणतात. ज्यांच्याकडे काम दिले आहे, त्यांच्याही काही समस्या आहेत. आतापर्यंत ९० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्यात येईल. दरम्यान, पुणे-सातारा महामार्गाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकाऱ्यांची बैठकही गडकरी यांनी शुक्रवारी घेतली. लांबलेला पाऊस थांबला असून महामार्गाच्या दुरूस्तीची कामे तातडीने करण्यात यावीत, भूसंपादनाच्या अडचणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने लवकरात लवकर सोडवाव्यात, अशा सूचना गडकरी यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2019 1:20 am

Web Title: repair the pune satara highway otherwise toll closure from 1st december abn 97
Next Stories
1 एलईडी बल्बच्या साहाय्याने मासेमारी सुरूच
2 बाळासाहेब ठाकरे अखेरच्या भाषणात म्हणाले होते…
3 सोनिया गांधी आणि शरद पवार यांची उद्याची नियोजित बैठक रद्द
Just Now!
X