लोकसत्ता वार्ताहर

डहाणू : पारनाका ते डहाणू फोर्ट दरम्यानचा सिमेंट रस्ता आजही मजबूत स्थितीत आहे. डहाणू शहरातील या एक कोटी १० लाख रुपये खर्चून तयार केलेल्या  रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या कामाला डहाणू नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांनी दिली होती.  मात्र पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर  रस्त्यावरील खडीमुळे नागरिकांची गैरसोय होऊ  नये यासाठी डहाणू नगर परिषदेने काही अटींवर काम करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, सुस्थितीत   रस्त्याच्या डांबरीकरणास स्थानिक नागरिकांनी विरोध कायम आहे.

डहाणू पारनाका ते गाव दरम्यान  सिमेंटच्या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात येणार आहे. परंतु त्यावर डांबरीकरण टिकणार नाही असे तज्ज्ञांचे मत आहे.  त्यापेक्षा आहे त्याच रस्त्याचे रुंदीकरणापुरते डांबरीकरण करा, अशी लोकांची मागणी आहे. हा प्रकार म्हणजे ठेकेदाराच्या हिताची सोय करणे असा  नागरिकांचा आरोप आहे. डांबरीकरणासाठी वापरलेली खडी आणि साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने काही दिवसातच खडी बाहेर येईल, असे नागरिकांचे मत आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यकारी अभियंता आणि सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता यांना सदरील कामावर आपल्या अभियंत्यांच्या नियंत्रणात काम करण्यासाठी विनंती केली आहे. चारपैकी दोन कामांना काही अटींवर काम सुरु करण्यास सांगीतले आहे.

-अतुल पिंपळे, मुख्याधिकारी, डहाणू नगर परिषद

डहाणू पारनाका ते फोर्ट रस्ता सुस्थितीत आहे. सिमेंट  रस्त्यावर डांबरीकरण टिकणार नाही. तरी मात्र डांबरीकरणाला परवानगी दिली जाते. ही केवळ जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे

-प्रकाश अभ्यंकर, नागरिक