सुधारित नागरिकत्व कायद्याला (सीएए) व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायद्याला (एनआरसी) विरोध करण्यासाठी व हे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शहरातील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने आज, शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. मोर्चात हजारोंच्या संख्येने मुस्लिम तसेच इतर समाजबांधव सहभागी झाले होते. मोर्चेकरी कायद्याच्या विरोधात काळे झेंडे फडकावले, काळ्या फिती बांधल्या होत्या तसेच हातात तिरंगे ध्वज व महापुरु षांच्या प्रतिमा घेऊन रस्त्यावर उतरले होते. कायदा मागे न घेतल्यास जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

जमिअत उलेमा ए-हिंद संघटनेच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चाला ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल बोर्ड, अहेले सुन्नत वल जमाअत, तबलिग जमाअत, रिपब्लिकन पक्षाचा गवई गट, बहुजन क्रांती मोर्चा, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जमीअते अहेले अदिस, जमाअते इस्लामी हिंद, महेदिया जमाअत, कम्युनिस्ट पक्ष, अल्पसंख्यांक प्रबोधन मंच, ऊर्जिता फौंडेशन, रहेमत सुलतान फौंडेशन आदींनी पाठिंबा दिला होता.

मोर्चानंतर झालेल्या सभेत विविध वक्त्यांनी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणावर जोरदार टीका केली. देशात अनेक प्रश्न असताना त्याकडे दुर्लक्ष करुन भाजप संविधानाच्या विरोधात कायदे करत आहेत. देशातील प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरल्यानेच असे निर्णय घेतले जात आहेत, त्यामुळे भारताची जगात बदनामी होत आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लाखो मुस्लिम शहीद झाले, मात्र ब्रिटिशांचे लांगुलचालन करणारे आज सत्तेवर आल्याले आम्हाला देशासंबंधी प्रश्न विचारत आहेत, कायदा मागे न घेतल्यास जेलभरो आंदोलन करणार असल्याचे मौलाना अन्वर नदवी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

बारा इमाम कोठला येथून जोरदार घोषणा देत मोर्चाची सुरु वात झाली. ‘भारत देश के चार सिपाही हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई..’,‘मोदी देशातील जनतेला शांततेत जगु द्या’ यासह सीएए व एनआरसी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नगर-औरंगाबाद महामार्गावरु न ईदगाह मैदान, स्टेट बँक चौकातुन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. मोर्चाचा समारोप राष्ट्रगीताने झाला. राष्ट्रगीतानंतर देशाच्या एकता व अखंडतेसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली.

क्षणचित्रे

  • मोठय़ा संख्येने नागरिक सहभागी होऊनही मोर्चा शांततेत व शिस्तबद्ध झाला
  •   विविध राष्ट्रपुरुषांच्या वेशभूषेतील लहान मुलांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
  •  मोर्चेकऱ्यांनी हाती तिरंगा ध्वज व राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा घेतल्या होत्या.
  •  पोलिसांनी सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेतली होती. मोर्चाच्या मार्गावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, मनोरे लावले होते.
  • दंगल नियंत्रक पथके, धडक कृती दले यासह मोठा बंदोबस्त तैनात होता.
  • शहरातून जाणारी पुणे-औरंगाबाद रस्त्यावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवली होती.