कडेगाव तालुक्यातील कोतीज आणि येतगावचे करोनाबाधित रुग्णांचे निकटच्या संपर्कातील १५ जणांचे करोना चाचणी अहवाल गुरुवारी सकाळी नकारात्मक आल्याने कडेगाव तालुक्याला दिलासा मिळाला आहे.

कडेगाव तालुक्यातील मुंबईस्थित मूळच्या कोतीज येथील ५५ वर्षांच्या व्यक्तीला करोनाची लागण झाल्याची माहिती १ मे रोजी समोर आली. मात्र तत्पूर्वी या व्यक्तीच्या दोन मुली, भाऊ, भावजय आणि पुतणी अशा पाच व्यक्ती कोतीज या मूळ गावी आल्या होत्या. करोनाग्रस्त रुग्णाशी निकटचा संपर्क आणि कोतीज येथील त्यांच्या संपर्कात आलेल्या ६ जणांना कडेगाव येथे संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले होते. या ११ जणांच्या स्वॅब नमुन्याची करोना चाचणी घेण्यात आली होती. दुसरी चाचणीही शुक्रवारी नकारात्मक आली.

तसेच येतगाव येथे मलकापूर, कराड येथून आलेल्या एका व्यक्तीला करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्या संपर्कात आलेले आई, वडील, डॉक्टर आणि कंपौंडर यांना हायरिस्क मध्ये संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले होते. या चौघांची दुसरी करोना चाचणी नकारात्मक आल्याने कडेगाव तालुक्याला मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, मुंबईहून आलेल्या शिराळा तालुक्यातील निगडी येथील तरुणीला करोना झाला असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर उपचारासाठी मिरजेतील करोना रुणालयात दाखल करण्यात आले आहे. १४ दिवसांच्या उपचारानंतर तिच्या स्वॅबचे नमुने करोना चाचणीसाठी आज घेण्यात आले असून त्याचा अहवाल उद्यापर्यंत मिळेल, असे नोडल अधिकारी डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले.